HMPV व्हायरसचा भारतातील नागरिकांना कितपत धोका? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे? वाचा सविस्तर
नवी दिल्ली: चीनमधून आलेला कोरोना व्हायरसने भारतासह संपूर्ण जगाला जवळपास दोन वर्षे वेठीस धरले होते. मात्र आता चीनमध्ये एक नवीन व्हायरस आल्याने संपूर्ण जगावर नवीन महामारीचा धोका निर्माण झाला आहे. कोविड-19 च्या 5 वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग पसरत आहे. त्याची लक्षणेही कोरोना व्हायरससारखी आहेत. या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) आहे, जो RNA विषाणू आहे. या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला असून त्यामुळे लोकांमध्ये हाहाकार माजला आहे. दरम्यान या व्हायरसचा भारतातील नगरिकांना आणि लहान मुलांना कितपत धोका आहे, याबद्दल साथीच्या आजारांचे तज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली आहे.
एचएमपीव्ही रोगाचा भारताला फारसा धोका नसल्याचे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले आहे. भारतातील नागरिकांना फारशी काळजी करण्याचे कारण नाही. चीनमध्ये सध्या नागरिक मास्क घालूनच फिरत आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र चीन देशात प्रदूषणाची समस्या मोठी असल्याने तेथील नागरिक कायमच मास्क घालून फिरत असतात. हा व्हायरस हा अत्यंत साधा आहे. कमी किंवा जास्त वय असलेल्या लोकांना हा व्हायरस होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. रवी गोडसे म्हणाले.
HMPV- knowledge maybe power but ignorance is bliss! pic.twitter.com/kMIsgEuDnY
— DrRavi (@DrGodseRavi1) January 5, 2025
पुढे बोलताना ते म्हणाले, लहान मुलांना हा एचएमपीव्ही व्हायरस होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता फारच दुर्मिळ आहे. भारतात कोरोना काळात चीनसारखा कडक लॉकडाउन नव्हता. त्यामुळे आपल्याकडील लहान मुलांची रोगप्रतिकरक शक्ती चांगली राहिली आहे. त्यामुळे भारतात हा व्हायरस फार पसरेल असे वाटत नाही. यावर कोणताही उपाय किंवा लस उपलब्ध नाही, असे रवी गोडसे म्हणाले.
HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
HMPV विषाणूने भारतातही थैमान घातले आहे. भारतात आठ महिन्यांच्या मुलीला HMPV व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, कर्नाटकमध्ये HMPV ची 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतासह अनेक देशांमध्ये HMPV संसर्ग आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही सतर्क आहे. आरोग्य विभागाने एचएमपीव्ही संदर्भात लोकांना एक सूचना जारी केली आहे. लोकांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगण्यात आले आहे.
1. शिंकताना किंवा खोकताना रुमाल आणि कापडाचा वापर करा.
2. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वापरणे सुरू करा.
3. खोकला आणि सर्दी झालेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.
4. इतरांशी हस्तांदोलन थांबवावे लागेल.
5.एकच टिश्यू पेपर किंवा रुमाल पुन्हा पुन्हा वापरू नका.
हेही वाचा: HMPV विषाणूचा जगभरात कहर, जाणून घ्या नवीन आलेल्या गंभीर विषाणूची लक्षणे
6.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बंद करावे.
7. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास, स्वतःहून औषध सुरू करू नका.
8. वारंवार डोळे, नाक आणि कानाला स्पर्श करणे टाळा.
9. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा