अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता देशभरातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या निर्मितीचा फायदा हा उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्राला होणार असून, राज्याच्या महसूलात जवळपास 20 ते 25 हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसबीआयच्या अहवालानुसार, अयोध्येतील राम मंदिर आणि इतर पर्यटन योजनांमुळे उत्तर प्रदेशचा कर महसूल 20 हजार कोटी रुपयांनी वाढून 25 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद) योजनेचा उत्तर प्रदेशला खूप फायदा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील पर्यटकांची संख्या आणि त्यांचा होणारा खर्च हा आता दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले होते. विदेशी पर्यटकांनी राज्यात 10 हजार कोटी रुपये खर्च केले होते. एसबीआयच्या अहवालानुसार, पर्यटनाला चालना देण्यासाठी राम मंदिर आणि इतर योजनांच्या आधारे राज्यातील पर्यटन खर्च यावर्षी 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.