
राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाढत्या थंडीची यामध्ये आणखी भर होत आहे. मंगळवारी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवस नोंदवण्यात आला, ज्यामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली. ज्यामुळे राजधानीतील सर्वात थंड दिवस ठरला. हवामान खात्याच्या मते, बुधवारीही अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे.
भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिल्लीत कमाल तापमान १३ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे सांगितले. पालम आणि लोधी रोड भागात थंड दिवसाची स्थिती नोंदवण्यात आली. हवामान खात्याच्या मते, कमाल तापमान सामान्यपेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस कमी असताना थंड दिवस घोषित केला जातो. मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान १५.७ अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा ३.३ अंश कमी होते. किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा ०.७ अंश जास्त होते.
हेदेखील वाचा : Delhi Air Pollution : दिल्लीत श्वास घेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण; खतरनाक बॅक्टेरियावर औषधांचाही होत नाही परिणाम
स्थानकनिहाय आकडेवारीनुसार, सफदरजंग येथे कमाल तापमान १५.७ अंश सेल्सिअस होते. पालममध्ये कमाल तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ५.७ अंशांनी कमी आहे. लोधी रोडमध्ये कमाल तापमान १५.८ अंश सेल्सिअस, रिज परिसरात १४.९ अंश सेल्सिअस आणि अयानगरमध्ये १४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
अनेक ठिकाणी किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस
सफदरजंग, लोधी रोड, रिज आणि अयानगरमध्ये किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. पालममध्ये किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळी सापेक्ष आर्द्रता १०० टक्के आणि संध्याकाळी ९१ टक्के होती.
धुक्याचा इशाराही जारी
हवामान विभागाने बुधवारी सकाळी दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे आणि पिवळा इशारा जाहीर केला आहे. बुधवारी कमाल तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. थंड दिवसांची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीची हवेची गुणवत्ता आणखी खालावली
दिल्लीची हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे. २४ तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ३१० नोंदवला गेला, जो अत्यंत खराब श्रेणीत येतो. सोमवारच्या २४४ च्या तुलनेत ही परिस्थिती आणखी बिकट आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, २७ स्थानके अतिशय वाईट श्रेणीत, १० निकृष्ट श्रेणीत आणि एक मध्यम श्रेणीत नोंदवली गेली. मुंडका येथे ३६९ हा सर्वात वाईट AQI नोंदवला गेला.