Former Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti's reaction on India-Pakistan war
श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे देशातील सीमा भागातील राज्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर नापाक कृती करत पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला केला. यामध्ये जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात या राज्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य पूर्ण ताकदीने लढा देत आहे. मात्र मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरच्या लोकांची काळजी व्यक्त केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चालला आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांना त्वरित चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान अर्थपूर्ण संवाद साधत नाहीत तोपर्यंत काश्मीरमधील परिस्थिती बिघडतच जाईल, अशी भूमिका मेहबूबा मुफ्ती यांनी मांडली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “भारत एक उगम पावणारी शक्ती आहे आणि पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या मागे पडत चालला आहे. दोन्ही देशांनी स्वतःला विनाशाच्या दिशेने ढकलणं थांबवायला हवं. जम्मू-कश्मीरमधील लोक, विशेषतः सीमावर्ती भागातील लोक दररोज संघर्ष करत आहेत.” असे म्हणत भावूक होत मेहबूबा मुफ्ती यांना अश्रू अनावर झाले.
भारत पाक युद्धासंबंधित अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
पुढे त्या म्हणाल्या की, “आपल्या मातांना अजून किती काळ यातना सहन कराव्या लागणार? आतंकी तळ नष्ट करण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे आणि आता हे युद्ध थांबले पाहिजे. आपण जगण्यावर आणि इतरांना जगू देण्यावर विश्वास ठेवायला हवा. लोकांनी दाखवून दिलं की पहलगाम हल्ल्याने आपल्याला किती खोलवर परिणाम केला होता, पण आता या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युद्ध कधीच कोणतंही समाधान नसतं आणि आता राजकीय तोडग्याचा काळ आला आहे, अशी भूमिका जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री होत मेहबूबा मुफ्ती यांनी घेतली आहे.
दोन्ही देशांकडे अणुशक्ती…
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, “माध्यमं खोटी गोष्ट का पसरवत आहेत? प्रचारालाही एक मर्यादा असते आणि दोन्ही बाजूंनी मीडिया नकारात्मक भूमिका बजावत आहे. आपण पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि दोन्ही देशांकडे अणुशक्ती आहे. मला भीती वाटते की हे युद्ध जर अणुयुद्धात बदलले, तर काहीच उरणार नाही. केवळ निरपराध लोकच मारले जातील.”