Former PM Rajiv Gandhi had called late former PM Manmohan Singh a Joker in Meeting
दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. काल (दि.26) त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. उद्या (दि.28) डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. सध्या त्यांचे पार्थिव मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. डॉ. मनमोहन यांच्या निधनामुळे जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र मनमोहन सिंग यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी हे एकदा भरसभेमध्ये जोकर म्हणाले होते. मात्र यामागे एक कारण देखील होते.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भर बैठकीमध्ये जोकर म्हटले होते. ही 1985 ते 1990 या पंचवार्षिक योजनेशी संबंधित बैठकीतील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. त्यावेळी योजना आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये योजना आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रेझेंटेशन दिले होते. यामध्ये ग्रामीण विकास आणि गरिबी निर्मूलन हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास जाणून घ्या एका क्लिकवर
मात्र तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे लक्ष हे शहरी विकासावर होते. मोठे महामार्ग, आधुनिक मॉल्स, रुग्णालये अशा प्रकल्पांना त्यांना प्राधान्य द्यायचे होते. मात्र मनमोहन सिंग यांचे सादरीकरण पाहून ते चांगलेच संतापले आणि सभेदरम्यानच त्यांनी त्यांना फटकारले. सादरीकरणानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी राजीव गांधींना नियोजन आयोगाबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी त्याचे वर्णन ‘जोकरों का समूह’ असे केले. ही टिप्पणी नियोजन आयोगाच्या सदस्यांना मोठा धक्का देणारी होती.
मनमोहन सिंग यांना द्यायचा होता राजीनामा
नियोजन आयोगाचे तत्कालीन सदस्य आणि माजी केंद्रीय गृहसचिव सी.जी. सोमय्या यांनी त्यांच्या ‘द ऑनेस्ट ऑलवेज स्टँड अलोन’ या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, या टीकेनंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. देशाच्या हिताचा हा निर्णय घाईचा असेल, असे त्यांनी मनमोहन सिंग यांना समजावून सांगितले. डॉ.सिंग यांनी अपमान सहन केला आणि त्यांच्या पदावर कायम राहिले. मात्र, राजीव गांधी आणि डॉ. सिंग यांच्यात मतभेद राहिले. जुलै 1987 मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांना नियोजन आयोगातून काढून टाकण्यात आले.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दोन दशकांनंतर पंतप्रधानपदी विराजमान
या घटनेनंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस जेव्हा दोन दशकांनंतर सत्तेत परतली तेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवाराच्या शोधत होत्या. डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांनी पंतप्रधान म्हणून निवड केली. हा निर्णय केवळ राजकारणातील एक प्रमुख वळण ठरला नाही, तर त्याने डॉ. मनमोहन सिंग यांना भारतातील सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून प्रस्थापित केले. ही घटना केवळ त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकते असे नाही तर नेतृत्व आणि दृष्टीकोनात फरक असूनही नेत्याचे मूल्य कालांतराने ओळखले जाते हे देखील दाखवते.