संतोष देशमुख यांच्या हत्येच्या न्यायासाठी लातूरमधील रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये परभणी अत्याचार व बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. यावरुन विरोधक देखील आक्रमक झाले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे येत आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेले नाही. यावरुन बीडमध्ये जोरदार वातावरण तापले असून रेणापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. उद्या (दि.28) देखील विशाल मूक मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये 50 गावांचे गावकरी सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या न्यायासाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमधील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग होता. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व त्यांचा मुलगा हे देखील या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मुलगी वैभवी हिने केलेल्या भाषणामुळे उपस्थित लोक देखील भावूक झाले होते.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्यावी अशी मागणी जनसमुदायाने केली आहे. तसेच तहसीलदार कार्यालयामध्ये शांततेमध्ये हा मोर्चा दाखल झाला. या मोर्च्याच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आलेयावेळी आंदोलकांच्या हातामध्ये न्याय मिळावा या आशयाचे फलक होते. मुख्य आरोपींसह कटाचा सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच हे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी.
तसेच सदरील संतोष देशमुख यांच्या पिडीत कुटूंबियांना व दहशती खाली असणाऱ्या मस्साजोग येथील ग्रामस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. संतोष देशमुख यांच्या कुटूंबियातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे. सदरील खुन प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत मुंडे कुटुंबाकडे असलेल्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा. सदरील घटनेचा गुन्हा नोंद करुन घेण्यास टाळाटाळ करून व विलंब करुन आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करुन, त्यांना या खुनामध्येसह आरोपी करण्यात यावे. परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आक्रोश मोर्चामध्ये करण्यात आली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केलेल्या भाषणामुळे उपस्थित सर्वजण भावूक झाले. माझ्या वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी. न्याय मिळेपर्यंत हा लढा लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे.