'तर बायको पळून जाईल'; वर्क-लाइफ बॅलन्सच्या मुद्द्यावर गौतम अदानी असं का म्हणाले?
भारतात गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणावरून बऱ्याच चर्चा रंगत असतात. यामध्ये वर्क लाइफ बॅलेन्स हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. उद्योगपती गौतम अदाणी यांनीही काम आणि खासगी आयुष्य यामधील समतोल साधण्याबद्दल ठाम मत मांडलं आहे. ‘माझं वर्क-लाइफ बॅलेन्स तुमच्यावर लादलं जाऊ नये. तुम्ही फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की, मी माझ्या कुटुंबासोबत चार तास घालवत आहे आणि मला त्यामधून आनंद मिळत आहे. कोणीतरी आठ तास घालवत आहे, जर आठ तास घालवत असेल तर बायको पळून जाईल”, असं मत त्यांनी मांडलं आहे.
#WATCH | Delhi | On work-life balance, Adani Group Chairman, Gautam Adani says, “Your work-life is balanced when you do things which you like doing…” pic.twitter.com/ePDdhJuL9W
— ANI (@ANI) December 26, 2024
काय म्हणाले गौतम अदानी?
एका मुलाखतीत बोलताना अदाणी यांनी खाजगी आयुष्य आणि काम या दोन्हीमध्ये संतुलन साधताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल भाष्य केले आहे. अदाणी म्हणाले की, “जे करण्यात तुम्हाला आनंद वाटतो, ते तुम्ही करत असाल तर तुमचे काम आणि खाजगी आयुष्य यामध्ये संतुलन आहे. याखेरीज तुमचे वर्क-लाइफ बॅलेन्स माझ्यावर लादले जाऊ नये आणि माझे वर्क-लाइफ बॅलेन्स तुमच्यावर लादले जाऊ नये. तुम्ही फक्त हे लक्षात घ्यायचे आहे की, मी माझ्या कुटुंबासोबत चार तास घालवत आहे आणि मला त्यामधून आनंद मिळतोय… कोणीतरी आठ तास घालवत आहे.. जर आठ तास घालवत असेल तर बायको पळून जाईल”.
पुढे बोलताना काम आणि खाजगी आयुष्य यांच्यात संतुलन ठेवण्यासाठी एकमेकांचा आनंद आणि वैयक्तिक समाधान असणे आवश्यक असल्याचा मुद्दा देखील अदाणी यांनी पुढे मांडला. ते म्हणाले की, “सांगण्याची गोष्ट ही आहे की, तुम्हाला आनंद येत असेल आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद येत असेल तर हेच वर्क लाइफ बॅलन्स आहे”.
नारायण मूर्ती काय म्हणाले होते?
इन्फोसिसचे संस्थापक एन. आर . नारायण मूर्ती यांन गेल्या वर्षी आठवड्यामध्ये ७० तास काम करण्याचे समर्थन केले होते. यानंतर या मुद्द्यावर देशभरात चर्चा सुरू झाल्या होत्या. मूर्ती यांनी देशाची उत्पादकता वाढवणे आणि जागतिक स्तरावर इतर प्रगत अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करण्यासाठी भारतीय तरुणांनी जास्तवेळ काम केले पाहिजे असे म्हटले होते.
त्यांच्या विधानावरून वाद सुरू झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना मूर्ती म्हणाले होते की, “मी निवृत्त झालो तेव्हा पर्यंत आठवड्याला ८५ ते ९० तास काम करायचो. १९६१ मध्ये मला प्री-यूनिव्हर्सिटी दिवसांपासून शिष्यवृत्ती मिळाली होती. आणि माझ्या अनेक समवयस्कांना सरकारी अनुदानित शिक्षणाचा लाभ मिळाला होता. आपल्यापैकी ज्यांनी असे फायदे मिळाले आहेत त्यांनी समाजाच्या भल्यासाठी कठोर परिश्रम घेणे हे देशाचे देणे लागते”.
हेही वाचा>> राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यावर? भाजपाची टीका, काँग्रेसचं प्रत्युत्तर; नेमका वाद काय?
भाविश अग्रवाल यांचाही मूर्तींना पाठिंबा
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी देखील नारायण मूर्ती यांच्या ७० तास काम करण्याच्या सल्ल्याला पाठिंबा दर्शवला होता. एका पॉडकास्टमध्ये बोलताना अग्रवाल यांनी सांगितेल की, “मी जेव्हा मूर्ती यांच्या विधानाला मी जाहीरपणे पाठिंबा दिला आणि मला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. पण मला पर्वा नाही. जगातील पहिल्या क्रमांकाचा देश उभारण्यासाठी या पिढीला तपस्या करावी लागेल.”
अग्रवाल यांनी काम आयुष्य यांच्यातील समतोल साधण्याच्या संकल्पनेबद्दल शंका व्यक्त केली होती. ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेत असाल तर तुम्हाला जीवनातही आनंद मिळेल. दोघेही सामंजस्याने एकत्र राहतील.”