नवी दिल्ली : न्यायालयीन आदेशाच्या अवमान केल्याप्रकरणी फरार उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya)विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेली सुनावणी (Hearing) गुरुवारी पुढे ढकलण्यात आली. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. न्यायालयापासून माहिती लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली विजय मल्ल्या २०१७ मध्ये दोषी आढळला आहे. या प्रकरणात त्याच्याविरोधात अवमान कारवाईची सुनावणी केली जात आहे.
[read_also content=”रशियन शिष्टमंडळ बेलारूसमध्ये २४ तासांपासून चर्चेच्या प्रतीक्षेत, युक्रेनचा गट अजूनही पोहोचलेलाच नाही, किव्हमध्ये हल्ले सुरुच https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/russian-delegation-waiting-for-ukraine-team-to-come-in-belarus-nrsr-248705.html”]
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. खंडपीठ गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब ठेवली. मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि किंगफिशर एअरलाईन्समधील प्रकरणात संपत्तीचे संपूर्ण तपशील उघड करण्यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप आहे.
याआधी १० फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला दोन आठवड्यांच्या आत प्रत्यक्ष हजर राहून किंवा वकिलामार्फत स्वतःची बाजू मांडण्यासाठी शेवटची संधी दिली होती. यावेळी न्यायालयाने त्याला ताकीद दिली होती. तुम्ही जर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आपले उत्तर सादर केले नाहीत तर तुमच्या अनुपस्थितीतच शिक्षेची सुनावणी पुढे चालू ठेवू आणि यावर अंतिम निर्णयही देऊ, अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला बजावले होते. न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे मल्ल्याची खैर नसल्याची चिन्हे दिसत आहेत.
मागील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ललित म्हणाले होते की, आता हे प्रकरण अवमानाचे आहे. नियमानुसार दोषीचेही म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. मात्र, मल्ल्या कधीही न्यायालयात हजर झाले नाहीत. आतापर्यंत केवळ त्यांचे वकीलच न्यायालयात येत होते. मल्ल्या कोर्टापासून पळ काढत आहे, असे न्यायालय म्हणाले होते. त्यावर अॅमिकस क्युरी जयदीप गुप्ता यांनी मल्ल्याला स्वत: येण्याची गरज नसल्याचे सांगितले होते.
केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी परराष्ट्र मंत्रालयाची एक नोट न्यायमूर्ती उदय उमेश ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाला सादर केली होती. त्यात त्यांनी मल्ल्याचे प्रत्यार्पण अंतिम टप्प्यात असल्याचे कळवले. त्यावर न्यायमूर्ती ललित यांनी आम्ही बराच काळ वाट पाहिली, असे मत नोंदवले. जर या व्यक्तीला कारवाईत भाग घ्यायचा असता तर तो येथे आला असता, पण त्याने आपले वकील पाठवले आहेत, हे उघड आहे, असेही न्यायमूर्ती ललित म्हणाले.