Monsoon Alert: हिमाचलमध्ये पावसाचा रुद्रावतार; तब्बल 11 ठिकाणी ढगफुटी अन्...; चार दिवस अक्षरश: धुवून काढणार
मंडी: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाण ढगफुटी झाली आहे. दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आज मंडी जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगफुटी झाली. गेल्या काही दिवसांत 5 ते 6 वेळेस मंडी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये आतापर्यंत 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मंडी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून, 34 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. आज हिमाचल प्रदेशमध्ये तब्बल 11 ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक घटना या मंडी जिल्ह्यात घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचलमधील तब्बल 282 पेक्षा जास्त मार्ग बंद करण्यात आले आहेत. चंदीगड-मनाली महामार्ग देखील बंद करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू
हिमाचल प्रदेशमधील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. व्यास नदीने तर रौद्रस्वरूप धरण केले आहे. महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकल्याचे समजते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. अनेक ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहा:कार
संपूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. देशातील अनेक राज्यात तूफान पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
कांगडा जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू; ‘या’ पर्यटनस्थळी ढगफुटी
हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परीतनवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सेज घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. यानंतर तेथील एका नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील पार्वती नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याचे समजते आहे.
कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाल्यावर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीचे भयानक स्वरूप यामध्ये दिसून येत आहे. हवामान विभगाने पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.