हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस (फोटो -सोशल मिडिया)
मंडी: हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पाऊस सलग सुरू असल्याने चिंता वाढली आहे. काही ठिकाणी ढगफुटी देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्य आपत्तीव्यवस्थापन केंद्राछ्या रिपोर्टनुसार, भुस्खलन होण्याची 22 ठिकाणे घोषित करण्यात आली आहेत. तर त्यातील 18 ठिकाणे अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
सरकारच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. 82 नागरिक जखमी झाले आहेत. जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आता पर्यन्त 75 कोटींचे नुकसान झाले आहे. 22 ठिकाणी सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत.
मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर जावे असे आवाहन सरकारने केले आहे. अति धोकादायक ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहा:कार
संपूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. देशातील अनेक राज्यात तूफान पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
हिमाचल प्रदेशबरोबरच जम्मू काश्मीरच्या राजौरी, डोडा, कठूआ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने आणि ढगफुटी झाल्याने 2 लहान मुले आणि 3 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने 25 जूनपासून 1 जुलैपर्यंत हिमचल प्रदेश आणि अन्य राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परीतनवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सेज घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. यानंतर तेथील एका नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील पार्वती नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याचे समजते आहे.
कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाल्यावर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीचे भयानक स्वरूप यामध्ये दिसून येत आहे. हवामान विभगाने पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा
गुजरात राज्यात देखील प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमधील 26 जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. तर तीन जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पानी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राजस्थानमध्ये देखील पावसाचा कहर
मान्सूनने देशातील अनेक राज्ये व्यापली आहेत. राजस्थानमध्ये देखील जोरदार पावसाने कहर केला आहे. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.