उत्तराखंडपासून गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, महापूर भूस्खलनाचा धोका वाढला
देशभरात दक्षिण-पश्चिम मान्सूनने अपेक्षेपेक्षा 9 दिवस आधीच जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली आहे. ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे देशाच्या अनेक भागांत पूर आणि भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. उत्तर भारतात डोंगर ते मैदान आणि शहर ते गाव, सर्वच ठिकाणी अविरत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
Breaking News : पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 600 हून अधिक भाविक जखमी
हिमाचल प्रदेशात मान्सूनसह संकटाची सुरुवात झाली आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत ढगफुटी, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे भीषण अराजकता निर्माण झाली आहे. सोलन जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिमला-कालका रेल्वेमार्गावर झाडं आणि दगड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय महामार्गांवर अनेक तास वाहतूक ठप्प राहिली. मंडी जिल्ह्यात ब्यास नदीचे पाणी धोरणाच्या पातळीवर पोहोचले असून, लारजी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंडोह धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. सुमारे ४४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात यापूर्वी तीन ठिकाणी ढगफुटीची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः मनाली परिसरात दोन वर्षांपूर्वी आलेल्या प्रलयंकारी पुराच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच, पुन्हा एकदा ब्यास नदी मार्ग बदलत आहे, जे अधिक चिंतेचा विषय बनले आहे. नदीकाठच्या अनेक घरांना आणि दुकांनांना मोठं नुकसान झालं आहे. सध्या हिमाचलमध्ये नोंदवले गेलेल्या हवामानसंबंधित अपघातांमध्ये ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद असून, कांगडा खोऱ्यात जोरदार पावसानंतर अनेक रस्ते पूर्णतः ठप्प झाले आहेत. हवामान खात्याने बिलासपूर, चंबा, हमीरपूर, कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन आणि ऊना या जिल्ह्यांमध्ये फ्लॅश फ्लडचा अलर्ट जारी केला आहे.
तर मैदानांमध्येही पावसाने कहर केला आहे. झारखंडच्या रामगड जिल्ह्यात प्रसिद्ध रजरप्पा सिद्धपीठाजवळील भैरवी नदीने रौद्ररूप धारण केले असून, या प्रवाहात वाहून गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जमशेदपूरमध्ये मैदानांची जागा जलाशयांनी घेतली असून, अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये गंगानदीचा पाण्याचा स्तर वेगाने वाढत असून, गंगा सध्या भीषण रूपात आहे. राजस्थानच्या पाली शहरात मुसळधार पावसामुळे रस्ते नद्यासारखे दिसत आहेत, तर ओडिशाच्या मयूरभंजमध्ये बुधबलंगा नदीच्या प्रवाहामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
बिहारमधील राजधानी पटना सहित दहा जिल्ह्यांमध्ये देखील हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, उत्तराखंडमध्येही पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकारने चारधाम यात्रा पुढील २४ तासांसाठी स्थगित केली आहे. गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ व केदारनाथकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना श्रीनगर किंवा रुद्रप्रयाग येथे थांबवले जात आहे, तर यमुनोत्री व गंगोत्रीकडे जाणाऱ्यांना विकासनगर व बडकोट येथे थांबवण्यात येत आहे.
उत्तरकाशी जिल्ह्यात बडकोटजवळ सिलाई बेंड येथे झालेल्या ढगफुटीमुळे एक हॉटेल बांधकामस्थळी भूस्खलन होऊन मजुरांच्या निवासस्थानावर मलबा कोसळला. या दुर्घटनेत दोन मजुरांचे मृतदेह सापडले असून सात जण अद्याप बेपत्ता आहेत. यमुना आणि गंगा राजमार्गांचे अनेक भाग बंद पडले असून वाहतूक ठप्प आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, देहरादून, टिहरी, पौडी, चंपावत, बागेश्वर, उधमसिंग नगर आणि हरिद्वार या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
एकूणच, उत्तर भारतात सध्या मान्सूनने धडक देताच निसर्गाचा प्रकोप सुरू झाला आहे. डोंगराळ भागांमध्ये ढगफुटी, भूस्खलन, तर मैदानांमध्ये पूर आणि जलभरावाची स्थिती गंभीर होत चालली आहे. प्रशासनाकडून सातत्याने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तास संपूर्ण उत्तर भारतासाठी आणखी धोकादायक ठरू शकतात.