राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले...
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अद्याप तुरळक पाऊस होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमधील सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान केंद्राच्या माहितीनुसार, मंगळवारीही मान्सूनचा प्रभाव कायम राहील आणि तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
केरळमधील हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत ११५.६ मिमी ते २०४.४ मिमी पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथानामथिट्टा, पालक्काड आणि कासारगोडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत येथे ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
दरम्यान, पथानामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाडसाठी मंगळवारकरिता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पथानामथिट्टा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलममध्ये बुधवारीही यलो अलर्ट कायम राहील.
उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट
उत्तराखंडमधील डेहराडून येथील हवामान केंद्राने मंगळवारकरिता यलो अलर्ट जारी केला आहे. डेहराडून, पिथोरगड, नैनिताल आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आणि उधम सिंग नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
भूस्खलन, दरड कोसळणे आणि अचानक येणाऱ्या पुराचा धोका असलेल्या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे, विजेचे खांब आणि इतर वास्तू उन्मळून पडू शकतात किंवा त्यांचे नुकसान होऊ शकते. मुसळधार पावसात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.






