दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात बदल, पहाटे मुसळधार पाऊस
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. शनिवारी सकाळी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, रस्त्यांवर पाणी जमा होत आहे.
हवामान विभागाने सकाळ ते दुपार दरम्यान काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. मोती बाग, फिरोज शाह रोड, एपीजे अब्दुल कलाम रोड आणि मंदिर मार्ग यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत कमाल तापमान ३२°C ते ३४°C आणि किमान तापमान २४°C ते २६°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ईशान्य मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागांवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे २२ ऑगस्ट रोजी पूर्व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत द्वीपकल्पीय भारतावर पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
रविवारी हवामान कसे असेल?
रविवार (दि.२३) दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहील. सकाळ ते दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी हलका ते अगदी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, रविवारी दिल्लीत कमाल तापमान ३२°C ते ३४°C आणि किमान तापमान २४°C ते २६°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य राहील, तर अनेक भागांमध्ये कमाल तापमानही सामान्य राहील. काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी असू शकते.
अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाने पश्चिम हिमालयीन प्रदेशात हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसात जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन झाले, ज्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.






