E-100 च्या वाहनांना इंधन पुरवठा कसा करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल (Photo - X)
नवी दिल्ली : तुम्ही 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्सी वाहनांचे धोरण आणले. मात्र, या E-100 वरील वाहनांना इंधन पुरवठा कसा सुनिश्चित केला जाईल, हे सांगा, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला. यावर अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामानी म्हणाले, यासाठी उत्पादन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागतील. सरकार त्यावर न्यायालयाला माहिती देईल, असे त्यांनी सांगितले. नंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची गरजही व्यक्त केली. न्यायमूर्ती सुंदरेश म्हणाले की, या समस्येकडे व्यापक जनहित आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येचे, विशेषतः खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हितही लक्षात घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती सुंदरेश म्हणाले, “देशातील मोठ्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मला सर्वात महत्त्वाचा वाटणारा तिसरा पैलू म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना सक्षम कसे बनवायचे या पैलूवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावर कोणीही बोलत नाही.”
यावर अॅटर्नी जनरल म्हणाले की, या खटल्यातील युक्तिवादादरम्यान ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही बोलतील. मात्र, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये २६ ऑक्टोबर रोजी सुधारणा अधिसूचित केल्या होत्या.
शुद्ध इथेनॉलवर चालणारी वाहने देखील नियमांमध्ये समाविष्ट
या अंतर्गत ई-१०० म्हणजेच जवळपास शुद्ध इथेनॉलवर चालणारी वाहने देखील नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. पूर्वी ई-८५ सारख्या उच्च्च इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी तरतूद होती. मात्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले होते की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांच्या पुढे वाढवण्याची कोणतीही त्वरित योजना नाही.
प्र.1. E-100 वाहन म्हणजे काय?
उ. 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या वाहनांना E-100 वाहने म्हणतात.
प्र.2. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणता सवाल विचारला?
उ. E-100 वाहनांना इंधनाचा पुरवठा कसा सुनिश्चित केला जाणार, असा सवाल न्यायालयाने विचारला.
प्र.3. E-100 वाहनांमध्ये कोणते इंधन वापरले जाते?
उ. या वाहनांमध्ये 100 टक्के इथेनॉल इंधन वापरले जाते.






