नवी दिल्ली: गेले काही दिवस देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पश्चिम भारतात जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान आज देखील भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड भागात जोरदार पाऊस सुरु आहे.
उत्तराखंड, हिमाचल, बिहारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. बिहारमध्ये आतापर्यंत तब्बल २६ जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने पुढील ७ दिवस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान भारतातील अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व आंध्र प्रदेशमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पाऊस असणार आहे.
दिल्लीत आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजवीन विस्कळीत झाले आहे. बिहारमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बिहारच्या २२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर
गेले काही दिवस हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैनीतालमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक नद्या धोका पातळीच्या वरून वाहत आहेत. तर हिमाचल प्रदेशममध्ये देखील दरडी कोसळणे आणि पूरस्थिती अशा घटना झाल्या आहेत. मंडी, शिमला आणि चंबा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात देखील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. तेलंगणामध्ये पुढील ६ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये पावसाने काही दिवस विश्रांती घेतत्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, राजस्थानमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. कोकण प्रदेशात संततधार सुरु आहे. पुणे जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक धरण बहुतांशी भरत आली आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली असल्याचे पाह्यला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरु आहे. शिवसागर जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटले जाते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात देखील पाऊस सुरु आहे.