India Rain Alert: वरूणराजा 'या' दोन राज्यांची परीक्षा घेणार; IMD च्या अलर्ट ने वाढवली चिंता
भारतात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु
दक्षिण भारतात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
उत्तराखंड व हिमाचल प्रदेशला रेड अलर्ट जारी
India Weather: भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तर काही ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर भारत आणि पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तराखंडमध्ये तर ढगफुटी झाली आहे. यामध्ये अनेक नागरिक अजूनही अडकून पडले आहेत. भारतीय हवामान विभागाने तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना ११ ऑगस्टपर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये हवामान विभागाने पुराचा धोका निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये देखील रेड अलर्ट जारी केला गेला आहे. तामिळनाडू राज्यात भवानी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये गंगा आणि यमुना नदीने प्रचंड स्वरूप धारण केल्याने २१ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट
६ ते ११ ऑगस्ट दरम्यान हवामान विभागाने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला रेड अलर्ट जारी केला आहे. अति ते अति मुसळधार पाऊस या कालावधीत होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. ढगफुटी, पूरस्थिती या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे .
दक्षिण भारतात पुराचे संकट
उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये देखील पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे.
उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान
उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. हर्षिलवळील धराली गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड मलबा वाहून आला आणि या मलब्यात शेकडो घरं गाडली गेली आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात हाहाकार माजला. ही घटना भारतीय लष्कराच्या कॅम्पपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर घडली असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. गंगोत्री धामचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. पावसाचे पाणी आणि डोंगरावरून आलेला मलबा इतक्या वेगात खाली आला की, संपूर्ण धराली गाव पाण्याखाली गेले. बाजारपेठा, हॉटेल्स, वाहने, घरे – सगळं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं. “अशी आपत्ती मी याआधी कधीच पाहिली नव्हती. सगळं काही क्षणात नष्ट झालं, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.