IMD Weather Update Heavy rain likely again in Delhi today Weather news
IMD Weather Update : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वरुणराजा हजेरी लावणार आहे, त्यामुळे दिल्लीकरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. हवामान खात्याने रविवार, १४ सप्टेंबर रोजी राजधानीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस हे ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सलग चार दिवस कडक सूर्यप्रकाश आणि आर्द्रतेनंतर दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
शनिवारी (दि.13) दिल्लीचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. येत्या काही दिवसांत ते १ ते २ अंशांनी कमी होऊ शकते. हवामान खात्याच्या मते, १४ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसासह हवामानात बदल होईल.
उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये पिवळा इशारा
१४ सप्टेंबर रोजी उत्तराखंडमधील देहरादून, नैनिताल, मसूरी, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, चंपावत आणि चमोली यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो इशारा जारी करण्यात आला आहे. यासोबतच जम्मू-काश्मीरमधील कठुआ, गुलमर्ग, श्रीनगरसह इतर भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येही दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा
१३ ते १८ सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच १३ ते १६ सप्टेंबर आणि १८ ते १९ सप्टेंबर दरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांचा इशाराही देण्यात आला आहे.
दक्षिण भारतातही मान्सून सक्रिय राहील
१३ ते १९ सप्टेंबर दरम्यान तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि यानममध्ये पावसाची शक्यता आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये १४ ते १६ आणि त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. काही भागात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पूर्व भारतातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
१४ ते १६ सप्टेंबर दरम्यान ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान बिहार, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम भारतातही पावसाचा जोर कायम
१४ आणि १५ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडू शकतो. याशिवाय १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान उत्तर पंजाब आणि पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ५ दिवसांत किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमाच्या काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छीमार आणि किनारी रहिवाशांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.