या जाहिरातीनंतर आता नाशिकमध्ये ‘देवा तूच सांग’ या बॅनर आणि जाहिराती झळकू लागल्या आहेत. राज्यभरात याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर या जाहिराती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या जाहीराती चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
‘अमिताभ यांना खुश करायला रेखांनी चक्क…’ अनेक वर्षांनी आलं समोर
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य केल्यानंतर राज्य सरकारने थेट जीआर काढला. राज्य सरकारने मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून राज्यभरात भाजपच्या वर्तुळातून ‘देवा भाऊ’हे कॅम्पेन राबवत राज्यभर जोरदार फलकबाजी आणि जाहिरातबाजी केली होती. फडणवीस यांच्या या जाहिरातबाजीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ‘देवा तूच सांग’या जाहिरातबाजीने प्रत्युत्तर दिले होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज, रविवार (दि. १४ सप्टेंबर) रोजी नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात पक्षाची आगामी रणनीती व स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली. या शिबिरानंतर सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी पक्षाच्या वतीने जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चातून शासनाविरोधात स्थानिक प्रश्नांवर तीव्र भूमिका मांडण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
जाहिरातीच्या शीर्षकात, ‘देवा तूच सांग’ असं लिहीलं आहे. तसेच, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या ओवीप्रमाणे राज्यात भेदभाव करून वाद वाढवण्यापेक्षा मुद्द्याचं बोला..! असं जाहीरातीत म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, पिकाला हमीभाव, तरुणांना नोकरीच्या संधी, लाडक्या बहिणींना 2100 रु., असुरक्षित महिला, कांदा निर्यातबंदी तसेच, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे करण्यात आला आहे. हे स्वार्थी सरकार पुरस्कृत ग्रहण कधी सुटणार? असा खोचक सवालही या जाहिरातीत करण्यात आला आहे.
याशिवाय, या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हानही राष्ट्रवादीकडून कऱण्यात आले आहे. दरम्यान नाशिकसह राज्यभरात देवा तूच सांग या बॅनर आणि जाहिरातीची राज्यभरात चर्चा सुरू आहे.






