नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची (Lok Sabha Elections Result 2024) उत्सुकता ताणली गेली आहे. सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, दुपारनंतर बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए 294 जागांवर आघाडीवर असून, ‘इंडिया’ आघाडी 146 वर आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानुसार, आता या दोन्ही जागांवर राहुल गांधी हेच आघाडीवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. तर स्मृती इराणी या पिछाडीवर आहेत. या निवडणुकांची मतमोजणी सुरु असून, येत्या काही तासांत निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक पार पडली. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याच्या मतदानाने ही प्रक्रिया सुरू झाली ती शनिवारी 1 जून रोजी सातव्या टप्प्याच्या मतदानाने संपली. सात टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे शनिवारी सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले. त्यात बहुतेक सर्वांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 300 च्या पुढे जागा घेऊन सत्तेत येत असल्याचा अंदाज वर्तवल्याने प्रत्यक्ष निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.