
'या' Youtube Channel संदर्भात सरकारचा महत्त्वाचा निर्णय (फोटो सौजन्य-X)
India bans 16 Pakistani YouTube channels In Marathi : २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधीस पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरे स्फोटात उडवून देण्यात आली आहेत. एनआयए या हल्ल्याचा तपास करत आहे. या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी हेरगिरीसाठी ड्रोनचा वापर केला होता.शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यात चिनी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो असा संशय एजन्सींना आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पुलवामा किंवा अनंतनागला पळून जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्ल्यानंतर या मार्गांवर हालचाल दिसून आली. याचदरम्यान आता दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.
भारत सरकारने पाकिस्तानातील जवळजवळ सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांचे यूट्यूब अकाउंट बंदी घातले आहेत. ज्यामध्ये जिओ न्यूज, डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूजसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील माहिती पसरवल्याबद्दल सरकारने या चॅनेल्सवर बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे चॅनेल भारत आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवत आहेत.
गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर सरकारने ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राजनाथ पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. दुसरीकडे, आज जम्मू-काश्मीर विधानसभेतही विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यामध्ये पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी १५ ठिकाणी छापे टाकले आहेत.हे छापे पीओकेमधून कार्यरत असलेल्या आणि पहलगाम हल्ल्याशी संबंध असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही याला प्रत्युत्तर दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर, प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आणि आपल्या सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूजसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे.
जेव्हा तुम्ही डॉन न्यूज किंवा जिओच्या यूट्यूब चॅनेलवर जाता तेव्हा ते चॅनेल उघडणार नाही. तिथे तुम्हाला “राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारी आदेशांमुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही” असे दिसेल. सरकारी काढून टाकण्याच्या विनंत्यांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया transparencyreport.google.com ला भेट द्या.” (हे इंग्रजीमध्ये दिसेल)
बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये जिओ न्यूज, डॉन, रफ्तार, बोल न्यूज, एआरवाय न्यूज, समा टीव्ही, सुनो न्यूज यासारख्या प्रमुख वृत्तसंस्थांच्या यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे. याशिवाय मुनीब फारूख, उमर चीमा, आस्मा शिराजी आणि इर्शाद भट्टी यांसारख्या प्रसिद्ध पत्रकारांचे यूट्यूब चॅनेल देखील ब्लॉक करण्यात आले आहेत. इतर बंदी घातलेल्या हँडलमध्ये उजैर क्रिकेट, द पाकिस्तान रेफरन्स, रझी नामा आणि समा स्पोर्ट्स यांचा समावेश आहे.