झारखंड: झारखंडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. झारखंडच्या लातेहार या घनदाट जंगलात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. या जोरदार गोळीबारात सुरक्षा दलांनी दोन कुख्यात नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या दोन नक्षलवाद्यांवर मोठे बक्षीस होते.
झारखंड जन मुक्ती मोर्चाकहा महत्वाचा नेता पप्पू लोहरा आणि २ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. पप्पू लोहरावर १० लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त कामगिरीत हे नक्षलवादी ठार झाले आहेत.
पलामूचे पोलीस उपमहानिरीक्षक वाय. एस. रमेश यांनी सांगितले की , सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी त्यांचे मृतदेह जप्त केले आहेत. नक्षलवादी लोहरा आणि त्यांचे साथीदार लातेहारच्या जंगलात असल्याची माहिती मिळताच लातेहारच्या पोलीस अधीक्षक यांनी सर्च ऑपरेशन सुरु केले.
गडचिरोलीत ५ नक्षलवादी ठार
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात देखील ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाचे युनिट सी- ६० आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी देखील नक्षलवादाचा समूळ बिमोड करण्याबाबत सांगितले आहे.
बसवराजू ते शंकर रावपर्यंत… १४ महिन्यांत इतक्या नक्षलवाद्यांचा खात्मा
केंद्र सरकारने २०२४ मध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. दरम्यान बुधवारी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलं. चकमकीत २६ हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. गेल्या १४ महिन्यांत ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. बुधवारी झालेल्या चकमकीत नवबल्ला केशव राव उर्फ बसवराजू मारला गेला. तो २०१० च्या दंतेवाडा हल्ल्याचा आणि २०१३ च्या झिरम घाटी हत्याकांडाचा मास्टरमाइंड होता. सुरक्षा दलांनी त्याच्यावर १.५ कोटी रुपयांचं बक्षीस लावलं होतं.
यापूर्वी १६ एप्रिल २०२४ रोजी कांकेर जिल्ह्यात मारल्या गेलेल्या २९ नक्षलवाद्यांमध्ये नक्षलवादी नेता शंकर राव देखील मारला गेला होता. त्याच्या डोक्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याचवेळी जानेवारी २०२५ मध्ये विजापूरमध्ये नक्षलवादी चालपती मारला गेला, त्याच्या डोक्यावर ९० लाख रुपयांचे बक्षीस होते. यापूर्वी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील हेबरी भागात सुरक्षा दलांनी विक्रम गौडाचा खात्मा केला. विक्रम गौडा दक्षिण भारतातील नक्षलवाद्याचा मोठा नेता होता. आता या जहाल नक्षलवाद्यांमध्ये माडवी हिडमाची पाळी आहे. तो देशातील सर्वात कुख्यात आणि नक्षलवादी नेता आहे. तो २०१० मध्ये झालेल्या ताडमेटला हल्ल्याचा सूत्रधार आहे. या हल्ल्यात ७६ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते
नवबल्ला केशव राव उर्फ बसवराजूच्या खात्माबाबत गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत की, भारताच्या नक्षलवादविरोधी लढाईच्या तीन दशकांमध्ये आपल्या सुरक्षा दलांनी सरचिटणीस स्तरावरील नक्षलवादी मारला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलमुक्त होईल. त्यांच्या घोषणेनंतर, नक्षलवादाचे उच्चाटन सुरूच आहे.