India-Pakistan ceasefire News:गेल्या चार-पाच दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला संघर्षाला विराम लागला आणि युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. भारतीय लष्कराचे DGMO आणि पाकिस्तानी लष्कराचे DGMO यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यात आला. यानंतर देशभरात डीजीएमओ म्हणजे नेमके काय आणि कोण आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
भारतीय लष्कराचे डीजीएमओ म्हणजेच लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक(DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई हे आहेत. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धबंदीमागे राजीव घई यांचा सर्वात मोठा सहभाग आहे. शनिवारी (१० मे) दुपारी पाकिस्तानी डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांनी जनरल राजीव घई यांच्यासोबत हॉट-लाइनवर फोन करून हल्ला थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर राजीव घई आणि काशीफ अब्दुल्ला यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय लष्कराने (Army) पाकिस्तानविरुद्ध केलेल्या हल्ल्यांची संपूर्ण रणनीती बनवण्याची जबाबदारी जनरल घई यांच्यावर होती.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये (२०२४), लेफ्टनंट जनरल घई यांनी साउथ ब्लॉकमधील लष्कराच्या मुख्यालयात डीजीएमओ म्हणून पदभार स्वीकारला. याआधी त्यांनी श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्स (१५ व्या कॉर्प्स) चे कमांडिंग इन चीफ (जीओसी) हे पद भूषवले आहे. लेफ्टनंट जनरल घई यांना नियंत्रण रेषेवर आणि काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढण्याचा विशेष अनुभव आहे. सर्व लष्करी कारवाया डीजीएमओच्या देखरेखीखाली होतात. डीजीएमओ हे भारतीय लष्करातील एक वरिष्ठ लेफ्टनंट जनरल ३-स्टार रँक अधिकारी आहेत. कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई डीजीएमओच्या देखरेखीखाली केली जाते.
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, युद्धबंदीदरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान
भारतीय सैन्यात, डीजीएमओची निवड लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्रालय संयुक्तपणे करतात. ७ व्या वेतन आयोगानुसार, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचा मूळ पगार दरमहा ₹१,८२,२०० ते ₹२,२४,१०० पर्यंत असू शकतो. युद्धादरम्यान, लष्करी कारवायांशी संबंधित सर्व निर्णय डीजीएमओ घेतात. त्याच वेळी, युद्धादरम्यान रणनीती बनवणारे डीजीएमओच असतात. डीजीएमओ थेट लष्करप्रमुखांना अहवाल देतात. डीजीएमओकडे लष्करी कारवायांशी संबंधित सर्व माहिती असते. याशिवाय, डीजीएमओ गुप्तचर संस्थांशी समन्वय साधतात. युद्ध सुरू झाल्यापासून ते युद्धबंदीपर्यंत, प्रत्येक लष्करी कारवाईचे निर्णय डीजीएमओ घेतात.
लष्कराच्या कारवायांमध्ये डीजीएमओ हे लष्करप्रमुखांचे उजवे हात मानले जातात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये उद्ध्वस्त केलेले जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे पाच दहशतवादी तळ डीजीएमओ आणि चिनार कॉर्प्स कमांडर यांनी ओळखले. २०२१ मध्ये, नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केली होती. विशेष म्हणजे दर मंगळवारी दोन्ही देशांचे डीजीएमओ हॉट-लाइनवर बोलतात. तथापि, शांततेच्या काळात, दोन्ही देशांच्या डीजीएमओ अंतर्गत अधिकारी फोनवरून एकमेकांशी बोलत असतात.
पहलगाम हल्ल्यानंतरही जनरल घई यांनी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष मेजर जनरल काशिफ यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. शनिवारी, जेव्हा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी युद्धबंदीच्या कराराची घोषणा केली होती, तेव्हा असेही नमूद करण्यात आले होते की, १२ मे रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा एकदा फोनवर बोलतील. या दरम्यान, शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर दोघांमधील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. विशेष म्हणजे भारतात डीजीएमओ हा लेफ्टनंट जनरल दर्जाचा तीन स्टार अधिकारी असतो, तर पाकिस्तानमध्ये तो दोन स्टार अधिकारी म्हणजेच मेजर जनरल दर्जाचा असतो. कारण भारतीय सैन्य हे एक मोठे सैन्य आहे, तर पाकिस्तानी सैन्य थोडे लहान आहे.