ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, युद्धबंदीदरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान
भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यानंतरही पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक सुरू आहे. विरोधी पक्षांकडून युद्धबंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली जात असताना भारतीय हवाई दलाने एक मोठं विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अजूनही कारवाई सुरू असल्याचं भारतीय हवाई दलाने म्हटलं आहे. हवाई दलाने सोशल मीडिया हँडल X वर ही माहिती दिली आहे.
India-Pakistan ceasefire: युद्धबंदी कराराबाबत काय चर्चा झाली…? काय म्हणाले विक्रम मेस्त्रीं
‘भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ठरवलेलं लक्ष्य योग्यरितीने पार पाडलं आहे. राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार ही कारवाई विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे करण्यात आली. तसंच कारवाई अजूनही सुरू असून योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल, असं हवाई दलाने म्हटलं आहे. तसंच तर्क आणि चूकीची प्रसिद्ध न करण्याचं आवाहन केलं आहे.
भारताने २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईअंतर्गत, तिन्ही सैन्यांनी एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थापित ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याला प्रत्युत्तर म्हणून, घाबरलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला आणि ड्रोन हल्ले केले. तथापि, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व पाकिस्तानी ड्रोन हवेत पाडले. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानवर अनेक हल्ले केले, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठे नुकसान झाले.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या मदतीने युद्धबंदीवर सहमती झाली, परंतु काही तासांनंतर, पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करून भारतावर ड्रोनने हल्ला केला आणि गोळीबार केला. दरम्यान, राजधानी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसह दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
”पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीवर चर्चा करणे भारतीय जनतेसाठी आणि त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींसाठी आवश्यक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम युद्धबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आमचा सामूहिक दृढनिश्चय दाखविण्याची ही एक संधी असेल. मला विश्वास आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने आणि जलदगतीने विचार कराल, असं पत्र राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.