Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन

आजची सातव्या पिढीतील इंजिने (उदा. WAP-7) ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. ही इंजिने ६,००० अश्वशक्तीपेक्षा (HP) जास्त ऊर्जा निर्माण करतात. ही इंजिने ताशी १३० ते १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहेत
_Maharashtra Politics - 2026-04-09T162734.013
भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन
Published on: 
Updated on: 
  • २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुमारे ४९२ नवीन लोकोमोटिव्ह तयार करण्याचे नियोजन.
  • सातव्या पिढीचे WAP-7 आणि अमृत भारत एक्सप्रेस क्लास इंजिनांवर विशेष लक्ष.
  • रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि वेगवान करणे.

Indian Railway: भारतीय रेल्वे ही भारतातील जनतेसाठी एका ऐतिहासिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. आज संपूर्ण भारतात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात रेल्वेने ४९२ नवीन प्रवासी लोकोमोटिव्ह (इंजिने) तयार करण्याची मोठी योजना आखली आहे. यामध्ये प्रामुख्याने सातव्या पिढीतील प्रगत 'WAP-7' आणि 'अमृत भारत' क्लास इंजिनांचा समावेश असेल. दरम्यान, देशात रेल्वेची सुरुवात कशी झाली आणि पहिल्या पिढीपासून आतापर्यंत त्यांनी किती प्रगती केली आहे, याबद्दल जाणून घेऊया.

भारताचा रेल्वे प्रवास १८५३ मध्ये साहिब, सिंध आणि सुलतान यांसारख्या वाफेवर चालणाऱ्या लोकोमोटिव्हने सुरू झाला. भारतात १६ एप्रिल १८५३ रोजी पहिल्यांदा रेल्वेची सुरूवात झाली. तेव्हाची स्थिती आजच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी होती. त्या काळातील रेल्वेची इंजिने कोळसा आणि पाण्यावर (वाफेवर) चालत असत. या इंजिनांतून प्रचंड धूर निघत असे आणि त्यांचा वेग अत्यंत कमी होता. प्रवास गोंगाटमय आणि कष्टदायक होता.

सुरुवातीच्या काळात रेल्वेचे डबे पूर्णपणे लाकडाचे बनलेले होते आणि सोयीसुविधांचाही अभाव होता. डब्यांचे दरवाजे बाहेरच्या बाजूला उघडत असत, जे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. १९०५ पर्यंत गाड्यांमध्ये पंख्यांची साधी सोयही नव्हती. उन्हाळ्यात डबे थंड ठेवण्यासाठी चक्क बर्फाच्या लाद्यांचा वापर केला जात असे.

आजची सातवी पिढी: ताकद आणि वेग

आजची सातव्या पिढीतील इंजिने (उदा. WAP-7) ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. ही इंजिने ६,००० अश्वशक्तीपेक्षा (HP) जास्त ऊर्जा निर्माण करतात. ही इंजिने ताशी १३० ते १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहेत. तसेच, ही पूर्णपणे विजेवर चालणारी आणि प्रदूषणमुक्त इंजिने आहेत.

आधुनिक डबे: सुरक्षितता आणि आराम

आजचे LHB (Linke Hofmann Busch) आणि अमृत भारत क्लास डबे हे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सक्षम आहेत. अलीकडील रेल्वेचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असून 'अँटी-टेलिस्कोपिक' आहेत, म्हणजेच अपघाताच्या वेळी ते एकमेकांवर चढत नाहीत. तर व्हॅक्यूम टॉयलेट्स, वातानुकूलन आणि अपघातांपासून वाचवणारी *'कवच' (Kavach) ही स्वदेशी सुरक्षा यंत्रणा यात बसवण्यात आली आहे.

भविष्यातील ध्येय: हायड्रोजन आणि एरोडायनॅमिक डिझाइन

भारतीय रेल्वे आता इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या डब्यांवर काम करत आहे. तसेच, हवेचा रोध कमी करण्यासाठी 'WAP-7D' सारखी एरोडायनॅमिक (वायुगतिकीय) डिझाइन असलेली इंजिने विकसित केली जात आहेत. या नवनवीन प्रयोगांमुळे भारतीय रेल्वे जागतिक स्तरावर एक नवीन ओळख निर्माण करण्यास सज्ज झाली आहे.