
Delhi Bomb Blast राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील लाल दिव्याजवळ एका चालत्या कारचा स्फोट झाला. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या कारचा पुलवामाशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे. सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्ली एका मोठ्या स्फोटाने हादरली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात किमान १० जण ठार आणि २४ जण जखमी झाले. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली.
प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की या स्फोटामुळे परिसरात असलेल्या लोकांनचे शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले, अनेकांच्या शरीराचे अवयव तर दूरवर फेकले गेले. जवळच्या पार्क केलेल्या वाहनांच्या खिडक्याही तुटल्या. अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीओ चौकापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. दरम्यान, स्फोटाच्या तपासात अमेरिकेने मदत करण्याची ऑफर दिली आहे.
Delhi Blast हा आत्मघाती हल्लाच; CCTV फुटेज समोर, स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये दहशतवादी उमर?
दिल्ली स्फोटाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात वापरलेली कार हरियाणाची आहे. तिचा क्रमांक HR26CE 7674 आहे. स्फोटानंतर, आरटीओकडून कारची माहिती गोळा करण्यात आली आणि ती गुरुग्राममधील मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याचे आढळून आले.
या माहितीनंतर, गुरुग्राम पोलिसांनाही तपासात समाविष्ट करण्यात आले. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान, मोहम्मद सलमानने त्याची कार दीड वर्षापूर्वी दिल्लीतील ओखला येथील रहिवासी देवेंद्रला विकल्याचे उघड केले.
सलमानने कारच्या विक्रीशी संबंधित सर्व कागदपत्रे गुरुग्राम पोलिसांना सोपवली आहेत. आता, ओखलामध्ये ती खरेदी करणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. देवेंद्रने ही कार हरियाणातील अंबाला येथे कोणालातरी विकल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर, अंबाला पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची? काही वेळातच सापडला ‘तो’ व्यक्ती; वाचा धक्कादायक माहिती
आता असे समोर आले आहे की ही कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी तारिकला विकण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये एक तरुण हातात चाव्या घेऊन कारसमोर उभा असल्याचे दिसून येत आहे. आता या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.
दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा, मुंबई आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील रेल्वे स्थानके, बस टर्मिनल, विमानतळ आणि धार्मिक स्थळांवर सखोल देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अयोध्येतील राम मंदिर आणि नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.