Jharkhand political guru Shibu Soren death reason political journey Marathi news
Shibu Soren Passed Away : झारखंड : राजकीय वर्तुळातून दुखःद बातमी समोर आली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे संस्थापक, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांचे आज (दि.04) निधन झाले. सकाळच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिबू सोरेन हे 81 वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. शिबू सोरेन यांना किडनीशी संबंधित समस्या होत्या. त्यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणातील एक अध्याय संपला असून त्यांना नेमके झाले काय होते याची चर्चा आता सुरु आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री असलेले शिबू सोरेन हे झारखंडचे ‘गुरुजी’ किंवा ‘दिशोम गुरु’ म्हणून ओळखले जात होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयात दाखल उपचार सुरु होते. त्याच रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना नेफ्रोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. शिबू सोरेन बऱ्याच काळापासून आजारी होते आणि १९ जून २०२५ पासून त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने झारखंडच्या राजकारणात आणि आदिवासी समाजात शोककळा पसरली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिबू सोरेन यांचे निधन दीर्घकालीन आजारपणामुळे झाले. ते अनेक आजारांनी ग्रस्त होते. त्यांच्या मृत्यूचे कारण दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार, मधुमेह, हृदयाशी संबंधित गुंतागुंत यामुळे झाले आहे. त्याचबरोबर अलिकडेच शिबू सोरेन यांना मेंदूचा झटका देखील आला असल्याचे सांगितले आहे. ते डायलिसिसवर होते. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया देखील झाली होती. जुलै २०२५ मध्ये त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती, परंतु ऑगस्टच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्यांचा मुलगा आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पत्नी कल्पना सोरेन यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत त्यांच्यासोबत होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिबू सोरेन कोण आहेत?
झारखंडच्या राजकारणावर अनेक वर्षे राज्य करणारे शिबू सोरेन हे झारखंडमध्ये गुरुजी म्हणून ओळखले जात होते. लहान असो वा मोठे, प्रत्येकजण शिबू सोरेन यांना ‘गुरुजी’ म्हणत असे. त्यांनी १९७० च्या दशकात झारखंडच्या आदिवासी समुदायाला सावकारांच्या शोषणातून मुक्त करण्यासाठी एक चळवळ सुरू केली. त्यांचे वडील सोबरन मांझी यांच्या हत्येने त्यांना सामाजिक आणि राजकीय संघर्षाच्या मार्गावर आणले. १९७३ मध्ये त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी झारखंडला वेगळे राज्य बनवण्यासाठी दशके संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाचे फलित म्हणजे २००० मध्ये झारखंड बिहारपासून वेगळे झाले. शिबू सोरेन यांनी दुमका येथून आठ वेळा लोकसभा खासदार आणि तीन वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले. ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री देखील होते. शिबू सोरेन यांचे राजकारण हे नेहमी चर्चेचा विषय ठरले आहे.