भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जुंपली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Kadu VS Bawankule : अमरावती : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे अनेकदा आंदोलन करताना दिसून येतात. बच्चू कडू हे त्यांच्या हटके जनआंदोलनांसाठीच ओळखले जातात. माजी मंत्री बच्चू कडू यांनी अनेकदा शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगासाठी आंदोलन उभी केली आहेत. आता पुन्हा एकदा कर्जमाफी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन उभे केले आहे. मात्र आता यावरुन महसूल मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मानधनावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे मानधन वाढवून मिळावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली असून यासाठी त्यांनी आंदोलन आणि उपोषण केले आहे. भाजप नेते व चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या या आंदोलनावर जोरदार टीका केली. अमरावतीमधील एका कार्यक्रमामध्ये बावनकुळे यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला. बच्चू कडू हे आंदोलनाच्या नावानं नाटकं करतात असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. यानंतर बच्चू कडू यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमरावतीच्या कार्यक्रमामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “अनेकांनी उपोषणाच्या नावाखाली नौटंकी केली. आंदोलन आणि उपोषण केली. त्यांनी कधीच मंत्री म्हणून काम करताना अमरावतीच्या हिताचा विचार केला नाही. या अमरावतीला अनेक मंत्री आणि नेते मिळाले आहेत. पण खोटारडे पणा एवढा की आंदोलनं करायची. आणि आंदोलनाच्या नावाखाली नाटकं करायची. दिव्यांग बांधवांना दीड हजारांवरुन अडीच हजार रुपये दर महिना देण्याचे काम अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे,” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बच्चू कडू म्हणाले की, “कार्यकर्ते रस्त्यावर येत असतील आणि त्याला तुम्ही नौटंकी म्हणत असाल तर शेतकऱ्यांना शिव्या देणे बंद करा. बावनकुळे जी…ही चांगली गोष्ट नाही. जे काही पैसे देत आहेत ते काही स्वतःच्या घरातून दिलेले नाहीत. मुख्यमंत्री हे काय काम करायला गेले नव्हते. आमच्या मेहनतीचे आणि आमच्या अधिकाराचे पैसे आहेत. हे टोमणे मारणं बंद करा. शासकीय कार्यक्रमामध्ये राजकीय वक्तव्ये करु नयेत. शेतकऱ्यांबाबत का बोलत नाहीत,” असा सवाल माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.