न्यायमूर्ती भूषण गवई असतील भारताचे पुढील सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी भारताचे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ देतील. गवई हे भारताचे 54 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. ते सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत असलेल्या संजीव खन्ना यांची जागा घेतील.
न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य असतील, ज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळेल. न्यायमूर्ती गवई मूळचे अमरावतीचे आहेत. ते माजी राज्यपाल आणि आरपीआय नेते आरएस गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.
मुंबईतून कायद्याची पदवी
अमरावती येथून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर गवई यांनी मुंबईतून कायद्याची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावती येथे वकिली केली. 1990 च्या सुमारास त्यांनी नागपुरात निवृत्त न्यायाधीश अधिवक्ता राजा. एस. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश झाले आणि नंतर त्यांना बढती देऊन सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची जबाबदारी देण्यात आली.
न्यायमूर्ती गवईंनी वकिलांना सुनावले
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींसमोर वकिलांनी मोठ्याने बोलणे आता सामान्य वाटत आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि भावी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका प्रकरणाची सुनावणी करत होते. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली होती. यावर त्यांनी कडक शब्दांत सुनावले.