करूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 39 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा अधिक जण जखमी
करूर : तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या तमिळनाडू वेट्टी कझगम (टीव्हीके) पक्षाने रॅली आयोजित केली होती. या आयोजित केलेल्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला असून, महिला आणि मुलांसह 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करुर येथील रॅलीसाठी आयोजकांनी 30000 लोकांसाठी परवानगी घेतली होती. मात्र, रॅलीमध्ये 60000 हून अधिक गर्दी जमली होती. शिवाय, विजय स्वतः त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा रॅलीत पोहोचले होते. मात्र, त्यांचे समर्थक आणि इतर लोक आधीच उपस्थित होते. बराच वेळ कडक उन्हात उभे राहिल्याने काही लोकांना त्रास जाणवू लागला आणि काही लोक बेशुद्ध पडले, ज्यामुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली.
हेदेखील वाचा : TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…
विजय यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा भाग म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली होती. विजय यांनी 30000 लोकांच्या रॅलीसाठी परवानगी मिळवली होती. मात्र, त्याच्या दुप्पट 60000 हून अधिक लोक उपस्थित होते. विजय हे दुपारी एक वाजता सभास्थळी पोहोचणार होते. मात्र, नमक्कल येथे एका रॅलीला संबोधित केल्यानंतर ते रॅलीच्या ठिकाणी सहा तासांपेक्षा जास्त उशिरा पोहोचले. त्यामुळे सभेचे नियोजित वेळापत्रकच कोलमडले.
विजय यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. गर्दी इतकी वाढली की, त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. अभिनेता-नेता विजय रॅलीमध्ये संबोधित करत असताना अचानक रॅलीमध्ये काही नागरिक बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना भाषण थांबवावे लागले. लोक बेशुद्ध पडल्याने एकच गोंधळ सुरु झाला. याच गोंधळादरम्यान धावपळ सुरु झाली. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेकांना मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार केले जात आहेत.