'माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका'; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ
वादग्रस्त विधाने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत राहणारे तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पण यावेळी प्रकरण आणखी गंभीर आहे. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. ‘मला सध्या असुरक्षित वाटत आहे, माझी सुरक्षा वाढवावी, असं माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान तेज प्रताप यांच्या या विधानाने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अलिकडेच तेज प्रताप यादव यांनी अनुष्का यादवसोबतचे त्यांचे नाते जाहीरपणे स्वीकारले होते. त्यानंतर, या नात्यामुळे संतापलेल्या लालू यादव यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी केली होती. आता तेज प्रताप स्वतः सुरक्षित नाही नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात असा प्रश्न उपस्थित झाला आहे की हा फक्त कौटुंबिक वाद आहे की यामागे मोठं राजकारण दडलंय.
माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, ‘सध्या मला असुरक्षित वाटत आहे,. मी सरकारला माझी सुरक्षा वाढवण्याची विनंती करतो. आमचे शत्रू सर्वत्र आहेत. माझ्या जीवाला धोका आहे.’
तेज प्रताप यादव त्यांचे वडील आणि भाऊ तेजस्वी यादव यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले, ‘वडिलांना माझ्या शुभेच्छा. त्यांना माझंही आयुष्य लाभूदे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. तेजस्वी पुढे जातील, बिहारचे मुख्यमंत्री बनतील, हा माझा आशीर्वाद आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
येत्या काही महिन्यात बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावरून राजकारण तापू लागलं असतानाच तेज प्रताप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी अनुष्का यादव सोबतचं नातं स्वीकारल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच ही पोस्ट त्यांनी डिलिटही केली. मात्र तोपर्यंत ही पोस्ट व्हायरल झाली होती. त्याच्या या पोस्टने बिहारच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर लगेच त्यांची आरजेडीतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाय कुटुंबातूनही बाहेर काढल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान आज त्यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुका, आरजेडीतून हकालपट्टी या सर्व गोष्टींचा या प्रकरणाशी संबध तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.