ओडिशा : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे तिकिटासाठी अनेक जण इच्छुक असतात, पण ज्यांना तिकीट मिळते ते खरेच स्वतःला भाग्यवान समजतात. पण कॉग्रेसच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. कारण, कॉग्रेसच्या आणखी एका उमेदवाराने आपले लोकसभेचे तिकीट पक्षाला परत दिले आहे. याचे कारणही विचार करायला लावणार असे आहे. परंतु, कॉंग्रेसवर मात्र नामुष्की ओढवली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी ओडिशा कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुरी, ओडिशामधील कॉग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. शनिवारी माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या की, पक्ष मला निधी देऊ शकला नाही म्हणून मी तिकीट परत केले आहे. दुसरे कारण म्हणजे सात मतदारसंघांतील काही जागांवर विजयी उमेदवारांना तिकीट दिले गेलेले आहे. त्याऐवजी काही कमकुवत उमेदवारांना तिकीट मिळाले त्यामुळे मी अशा परिस्थितीत निवडणूक लढवू शकत नाही.
माझ्या मागणीकडे पक्षाने लक्ष दिले नाही
जेव्हा मी माझे तिकीट परत केले. तेव्हा मला पक्षाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाकडून निधी मिळणार नसल्यामुळे मी स्वतःच माझा निधी उभारायचा असे मला सांगण्यात आले. याशिवाय माझे पक्षश्रेष्ठींशी विशेष बोलणे झालेले नाही. केवळ विधानसभेच्या जागांवर चांगले उमेदवार द्या, अशी मागणी केली. पण त्याचीसुद्धा दखल पक्षाने घेतलेली नाही. मला दुसऱ्या पक्षांबद्दल माहिती नाही. पण जेव्हा त्यांच्य़ाकडे कोणी तिकीट मागते तेव्हा ते देताना अतिशय लोकशाही पद्धतीने आणि केंद्रीय नेतृत्वाकडून लक्ष घालून दिले जाते, असेही मोहंती पुढे म्हणाल्या.
या निर्णयाला केंद्र सरकार जबाबदार
यंदा कॉग्रेसची स्थिती वेगळी आहे. कारण, भाजप सरकारने कॉग्रेसच्या सर्व प्रकारच्य़ा निधीवर निर्बंध आणले. अकाउंटस फ्रीज केले. एकूणच केंद्र सरकारला कॉग्रेसला चांगल्या प्रकारे प्रचार करता येत नाही, यासाठी ही खेळी केली आहे. त्यामुळे पक्ष आपल्या उमेदवारास निधी देण्यास असमर्थ आहे. मी माझ्या प्रचारासाठी कोणी निधी देते आहे का? यासाठी प्रयत्न केले पण ते होऊ शकले नाही. त्यामुळे दिवस कमी असताना हे सर्व घडवून आणणे कठीण आहे. मला साध्या पद्धतीने प्रचार करावा लागला असता पण वेळ कमी असल्याने आता हे सर्व काही शक्य नाही, असे सांगत मोहंती यांनी पक्षाला तिकीट परत देऊ केले.