डॉ. मोहन यादव
भोपाळ : राज्यातील कोणताही जवान शहीद झाल्यास त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रक्कम दिली जाणार असून, त्यातील 50 टक्के रक्कम ही त्याच्या पत्नीला आणि 50 टक्के रक्कम पालकांना देण्यात येईल, असा निर्णय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घेतला आहे. शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या संदर्भात घेतलेल्या या निर्णयाचा अनेकांना फायदा होणार आहे.
भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. याबाबत यादव यांनी सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये यादव यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही निर्णय घेतला आहे की राज्यातील कोणत्याही जवान शहीद झाल्यास 50 टक्के रक्कम पत्नीला आणि 50 टक्के रक्कम पालकांना दिली जाईल’.
दरम्यान, शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई- वडिलांनी त्यांच्या सुनेने त्यांना काहीही दिले नाही आणि सून घर सोडून गेली, असा आरोप केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. यासोबतच त्यांनी मध्य प्रदेशमध्ये 7 हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही भरती वर्षभरात केली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.