Devendra Fadnavis: 'यमुने'वरून राजकारण तापलं; फडणवीसांची केजरीवालांवर टीका; म्हणाले, "तुम्ही आताच डुबकी..."
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची निवडणूक अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे. 5 तारखेला मतदान होणार आहे. तर 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. भाजप आणि आम आदमी पक्षात मुख्य लढत आहे. तर इंडिया आघाडीमध्ये एकत्रित असणारे आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस हे स्वबळावर लढत आहेत. दरम्यान भाजपने दिल्लीच्या निवडणुकीत अनेक स्टार प्रचारक उतरवले आहेत. काल महराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रचारसभेला संबोधित केले. यावेळेस त्यांनी अरविणे केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यमुना नदी स्वच्छ करू असे वचन दिले होते. नदी साफ करून त्यात मंत्रीमंडळासह डुबकी मारतील असे त्यांनी सांगितले होते.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बलबीर मतदारसंघात प्रचारसभा घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी यमुना नदीच्या प्रदूषणावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी वचन दिले होते की, ते यमुना नदी स्वच्छ करतील. त्यानंतर ते आणि त्यांचे मंत्रिमंडळ यमुनेत स्नान करतील. मात्र आता तर यामुनेचे पाणी आधीपेक्षा जास्त प्रदूषित आहे. अरविंद केजरीवाल तुम्ही आताच तुमच्या मंत्रिमंडळासह यमुनेत डुबकी मारा आणि दिल्लीपासून दूर निघून जा. दिल्लीची जनता तुम्हाला हेच सांगत आहे.”
यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या
प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.
हरयाणा सरकारची भूमिका काय?
अरविंद केजरीवाल यांनी असे गंभीर आरोप केल्यानंतर हरयाणा सरकार देखील आक्रमक झाले आहे. हरयाणा राज्य आपत्ती व्यवस्थापनाने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सोनीपत कोर्टात खटला दाखल केला आहे. कोर्टाने राज्य सरकारची याचिका स्वीकारली आहे. याचिका स्वीकार केल्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना नोटिस पाठवली आहे. 17 फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.