यमुना नदीच्या विषबाधेच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले. (फोटो - नवभारत)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. आम आदमी पक्ष, भाजप व कॉंग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे. दिल्ली मिळवण्यासाठी भाजप पुरेपर प्रयत्न करत असून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मैदानात उतरले आहेत. दिल्लीच्या उस्मानपूर भागात प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे.
दिल्लीच्या प्रचारसभेमध्ये आप नेते अरविंद केजरीवाल यांनी गंभीर आरोप केले होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी हरियाणात भाजपाचे लोक यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळत आहेत आणि तेच पाणी दिल्लीत पाठवलं जात आहे, असा आरोप केला होता. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मला व दिल्लीत राहणाऱ्या सर्व न्यायाधीशांना मारण्यासाठी आपले हरियाणातील बांधव यमुनेच्या पाण्यात विष मिसळतील का?” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने ते बिथरले आहेत. मला विचारायचं आहे की हरियाणाचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाण्यात विष मिसळतील का? मोदी व देशातील सर्व न्यायाधीश, जगभरातील विविध देशांच्या दूतावासातील अधिकारी तेच पाणी पितात. हरियाणातील लोक मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी त्यांच्या पाण्यात विषय मिसळतायत असं केजरीवाल म्हणत आहेत. मुळात असा विचार तरी कोणी करू शकतं का?” असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला आहे.
पुढे मोदी म्हणाले की, “आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवालांनी केवळ हरियाणातील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. एखाद्याची चूकभूल माफ करणं ही आपली संस्कृती आहे. परंतु, कोणी जाणून बुजून चुका करत असेल, देशालाच अपमानित करत असेल तर देश त्याला कधीच माफ करत नाही. हरियाणाचे लोक देशभक्त आणि धार्मिक आहेत. केजरीवालांच्या वक्तव्याने हरियाणातील लोकांचा अपमान झाला आहे, त्याचबरोर त्यांनी संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे,” असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
महाकुंभ मेळा दुर्घटनेसंबंधित अपडेट मिळवा एका क्लिकवर
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “केजरीवालांना अशी भाषा शोभत नाही. दिल्लीची जनता त्यांना येत्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल. त्यांचा अंहकार यमुनेच्या पाण्यात बुडेल. “हे ‘आप’वाले नाहीत हे ‘आपदा’वाले (आपत्ती) आहेत. यांना जनतेची कामं करायची नाहीत. या लोकांनी भारताच्या शूर सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. आपल्या वीरांना पुरावे मागितले. मी दिल्लीच्या जनतेला आवाहन करतो की येत्या पाच तारखेला विधानसभेच्या निवडणुकीत या लोकांना धडा शिकवा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे.