सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना धाडली नोटीस (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.
हरयाणा सरकारची भूमिका काय?
अरविंद केजरीवाल यांनी असे गंभीर आरोप केल्यानंतर हरयाणा सरकार देखील आक्रमक झाले आहे. हरयाणा राज्य आपत्ती व्यवस्थापनाने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सोनीपत कोर्टात खटला दाखल केला आहे. कोर्टाने राज्य सरकारची याचिका स्वीकारली आहे. याचिका स्वीकार केल्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना नोटिस पाठवली आहे. 17 फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा: ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल अडचणीत; हरियाणा सरकार खटला दाखल करणार, मोठं कारण आलं समोर
नरेंद्र मोदींची केजरीवाल यांच्यावर टीका
अरविंद केजरीवाल यांच्या यमुना नदीत विष मिसळण्याच्या वक्तव्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला व दिल्लीत राहणाऱ्या सर्व न्यायाधीशांना मारण्यासाठी आपले हरियाणातील बांधव यमुनेच्या पाण्यात विष मिसळतील का?” असा सवाल उपस्थित केला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने ते बिथरले आहेत. मला विचारायचं आहे की हरियाणाचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाण्यात विष मिसळतील का? मोदी व देशातील सर्व न्यायाधीश, जगभरातील विविध देशांच्या दूतावासातील अधिकारी तेच पाणी पितात. हरियाणातील लोक मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी त्यांच्या पाण्यात विषय मिसळतायत असं केजरीवाल म्हणत आहेत. मुळात असा विचार तरी कोणी करू शकतं का?” असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला आहे.
पुढे मोदी म्हणाले की, “आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवालांनी केवळ हरियाणातील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. एखाद्याची चूकभूल माफ करणं ही आपली संस्कृती आहे. परंतु, कोणी जाणून बुजून चुका करत असेल, देशालाच अपमानित करत असेल तर देश त्याला कधीच माफ करत नाही. हरियाणाचे लोक देशभक्त आणि धार्मिक आहेत. केजरीवालांच्या वक्तव्याने हरियाणातील लोकांचा अपमान झाला आहे, त्याचबरोर त्यांनी संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे,” असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.