
श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यातच मोठा स्फोट; सहा जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी
श्रीनगर : श्रीनगरमधील नौगाम पोलिस ठाण्यात मोठा स्फोट झाला. हा स्फोट शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झाल्याची माहिती दिली जात आहे. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले. डझनभराहून अधिक वाहनांना आग लागली. या स्फोटामुळे जवळच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. हा स्फोट इतका मोठा की, आसपासच्या परिसरात याचा आवाज आला.
फरिदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटक पदार्थांचे नमुने घेताना हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे, परंतु, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. जप्त केलेले स्फोटक अमोनियम नायट्रेट होते. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी उजाला सिग्नस, एसएमएचएस आणि ९२ बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जखमींवर या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद (अजेएयूएच) शी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा उलगडा झाला, त्याच पोलिस ठाण्यात हा स्फोट झाला आहे. फरीदाबादमध्ये दोन ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) यांना अटक केल्यानंतर, पोलिस स्टेशनच्या एसएचओने केलेल्या तपासात २९०० किलोग्रॅम स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली.
स्फोटानंतर लागली आग
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर मोठी आग लागली, ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. पोलिस स्टेशन आणि आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या फुटल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सर्वत्र घबराटीचे वातावरण होते. स्फोटस्थळी कोणालाही जाऊ दिले जात नव्हते.
हेदेखील वाचा : Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
घटनास्थळ सील
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, यातील दोन मृतदेह पाहिले. स्फोटानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले. कोणालाही पुढे जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. या घटनेनंतर घटनास्थळच सील करण्यात आले आहे.
350 किलो स्फोटके होती पोलिस ठाण्यात?
जम्मू-काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधील डॉ. मुझम्मिल गनई यांच्या घरातून जप्त केल्यानंतर ३६० किलो स्फोटके नौगाम पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आली. या दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी मुझम्मिल हा एक आहे.