mallikarjun kharge
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कायम राहणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, खरगे केवळ पक्षाध्यक्ष म्हणूनच नव्हे तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही विरोधी पक्षांशी चर्चा करतील. अशा स्थितीत खरगे यांच्याकडे दोन पदे राहिल्यास ते काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणाच्या विरोधात असणार आहे.
दुसरीकडे, राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या (सीएससी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सीएससीची बैठक रविवारी दिल्लीतील एआयसीसीच्या मुख्यालयात झाली. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर खऱगे यांची ही पहिलीच सुकाणू समितीची बैठक होती. ते म्हणाले की, माझा विश्वास आहे की पक्ष आणि देशाप्रती असलेल्या जबाबदारीचा हा सर्वात मोठा भाग आहे. काँग्रेस संघटना मजबूत असेल, उत्तरदायी असेल, लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करत असेल, तरच आपण निवडणुका जिंकू शकू आणि देशातील जनतेची सेवा करू शकू.
या बैठकीला पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केसी वेणुगोपाल, पी चिदंबरम आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.