'आम्ही मृतदेह तरंगताना पाहिलेत, त्यावेळी कोणी का...'; बेंगळुरू चेंगराचेंगरीवरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून खरगे भडकले
बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आयपीएलमधील विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर काहीजखमी झाले. या घटनेनंतर भाजपने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मल्लिकार्जुन खडगे यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेला दुर्दैवी घटना म्हटलं आहे. तसंच भाजपच्या राजीनाम्याच्या मागणीवर सवाल उपस्थित केले. त्यांनी उत्तर प्रदेशातील कुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत आणि कोविड काळातील मृत्यू आणि अन्य घटनांचा उल्लेख करत विचारलं,”कुंभ मेळ्यात लोक मृत्युमुखी पडले, तेव्हा कुणी राजीनामा दिला का? कोविडच्या वेळी आपण मृतदेह पाण्यात तरंगताना पाहिले. तेव्हा कोणाला जबाबदार ठरवलं?” खडगे यांनी स्पष्ट केलं की ही घटना नियोजनातील चूक असेल, पण ती कोणत्याही प्रकारे जाणूनबुजून घडवून आणलेली नव्हती. काँग्रेस सरकारने याबाबत दिलगिरी व्यक्त केली असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही याप्रकरणी भाजपवर टीका करताना पूर्वीच्या अनेक घटना उघड केल्या. त्यांनी विचारले,”कुंभ मेळ्यात ४०-५० लोक मृत्युमुखी पडले, तेव्हा आपण राजीनामा मागितला का? गोध्रा घटनेच्यावेळी मुख्यमंत्री कोण होते? एका फ्लायओव्हरचे उद्घाटन करताना तो कोसळून १४० लोकांचा मृत्यू झाला. पण मी पंतप्रधानाचा राजीनामा मागितला का?”त्यांनी भाजपने राजकीय हेतूतून आरोप केल्याचं सांगत, या प्रकारात सरकारने दिलगिरी व्यक्त केली असून दोषी ठरलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केले.
बेंगळुरूतील भगदड ही एक दुर्दैवी घटना असली तरी ती संपूर्णपणे काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाली, असा भाजपचा आरोप आहे. याउलट काँग्रेसने भाजपवर पूर्वीच्या घटनांमध्ये मौन पाळल्याचा आरोप करत त्यांची राजीनाम्याची मागणी “राजकीय नाटक” असल्याचे म्हटले आहे. सद्यस्थितीत ही घटना राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडली असून, तपास आणि कारवाईच्या निर्णयाची वाट सर्वजण पाहत आहेत.