मणिपूरमध्ये उग्रवाद्यांचा CRPF कॅम्प, पोलीस ठाण्यावर हल्ला
मणिपूरमध्ये आज सुरक्षादले आणि उग्रवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी झालेल्या चकमकीत ११ उग्रवादी ठार झाले असून २ सीआरपीएफचे जवान जखमी झाले आहेत. उग्रवादी जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरातील एका पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यासाठी आले होते. मात्र सुरक्षादलांनी हा हल्ला परतवून लावला. सीआरपीएफच्या कॅम्पवरही हल्ला केल्याची माहिती आहे. दरम्यान उग्रवाद्यांकडून ४ रायफल, ३ एके-४७ आणि रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
या धुमश्चक्रीत कुकुी उग्रवाद्यांनी परिसरातील घरांनाही आग लागली. जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या हल्ल्याला सीआरपीएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि ११ उग्रवाद्यांना ठार केलं.
मिळालेल्या माहितीनुसार बोरोबेकरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जकुराधोरमध्ये उग्रवाद्यांनी मैतेई समाजाच्या घरांना आग लावली. जकुराधोर करोंग बोरोबेकरा पोलिस स्टेशनपासून सुमारे १०० मीटर अंतरावर स्थित आहे. सीआरपीएफ आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांचे जवान बोरोबेकरा पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहेत, जिथे एक मदत शिबिरही आहे. हल्लेखोर शिबिरालाही लक्ष्य करण्याच्या तयारीत होते.
सशस्त्र उग्रवाद्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला, त्यावेळी सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यात किमान ११ दहशतवादी ठार झाले. जिरीबामच्या बोरोबेकरा पोलीस स्टेशनला गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक वेळा लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यापूर्वी काल, इन्फाळ ईस्ट जिल्ह्यातील मैतेई बहुल गाव सनासाबीमध्ये कुकी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
हेही वाचा-कांद्याला मिळतोय 7151 रुपये प्रति क्विंंटलचा भाव; किरकोळ बाजारात कांदा दर 80 रुपये प्रति किलोवर!
पोलिसां दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दहशतवाद्यांनी धान कापणी करणाऱ्या मैतेई शेतकऱ्यांवर आधी गोळीबार केला आणि नंतर बॉम्ब फेकले. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बीएसएफच्या पथके घटनास्थळी दाखल झाली. दहशतवाद्यांशी आणि बीएसएफच्या जवानांशी सुमारे ४० मिनिटे चकमक उडाली होती. दहशतवाद्यांच्या गोळीबारात बीएसएफच्या महार रेजिमेंट-४ चा एक जवान जखमी झाला. मणिपूरमध्ये गेल्या चार दिवसांत हा आठवा हल्ला आहे. या हल्ल्यात बीएसएफ आणि सीआरपीएफचे एक-एक जवान जखमी झाले असून दोन महिलांचा आणि एका डॉक्टराचा मृत्यू झाला आहे.
उग्रवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बराच काळ गोळीबार सुरू होता. जखमी शेतकऱ्यांचा याइंगंगपोकपी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. त्याआधी शनिवार रोजी चुराचांदपूर जिल्ह्यात डोंगराळ भागातून उग्रवाद्यांनी गोळीबार केला होता.
या गोळीबारात विष्णुपुर जिल्ह्यातील सैटोन येथील शेतात काम करणारी ३४ वर्षांची महिला शेतकरी ठार झाली होती. इंफाल पूर्व जिल्ह्यातील सनसाबी, थमनापोकपी आणि सबुंगखोक खुनौ या ठिकाणी रविवारीही असेच हल्ले झाले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात इंफाळ खोऱ्यात मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.