भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिक्षा संपली! उत्तर भारतातील या नावावर शिक्कामोर्तब?
भाजप नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या शोधात असून गेल्या काही दिवसांपासून अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा चेहरा निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले मनोहर लाल खट्टर पक्षाचे पुढचे अध्यक्ष असण्याची शक्यता आहे. या नावावर केवळ भाजपच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सहमती दर्शवल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी नवीन नाव जाहीर होणार असल्याचं भाजपकडून आधीच सांगितलं गेलं होतं, मात्र तो निर्णय पुन्हा पुन्हा लांबणीवर टाकला जात होता. आता मात्र पक्षात व संघात सखोल चर्चा झाल्यानंतर मनोहर लाल खट्टर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.
भाजपमध्ये “एक व्यक्ती, एक पद” ही परंपरा पाळली जाते. त्यामुळे खट्टर अध्यक्षपद स्वीकारल्यावर केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. जे.पी. नड्डा यांनीही अध्यक्ष बनल्यानंतर आपलं मंत्रीपद सोडलं होतं आणि 2024 च्या निवडणुकीनंतर मंत्री बनले असले, तरी काही महिन्यांत नवीन अध्यक्ष नेमले जातील, अशी अपेक्षा होती.
मनोहर लाल खट्टर हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. त्यांच्या निवडीमागचं मुख्य कारण म्हणजे संघ आणि भाजप या दोन्ही संघटनांमध्ये त्यांनी अनेक दशकं दिलेलं योगदान. मुख्यमंत्री होण्याआधी खट्टर यांनी संघटनात्मक कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांनी देशभर प्रवास केला असून, संघाशी असलेला त्यांचा दृढ संबंध हा त्यांच्या नावावर सहमतीसाठी निर्णायक ठरला आहे.
भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, खट्टर यांच्या नावावर निर्णय घेण्यापूर्वी संघप्रमुख मोहन भागवत यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचं कौतुक करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी जे नेतृत्वगुण दाखवले, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रभावित झाले असल्याची माहिती आहे.
खट्टर यांच्या निवडीमागचं आणखी एक कारण म्हणजे त्यांनी कायम लो-प्रोफाईल राहून संघटनात्मक कामांवर भर दिला. संघाच्या दृष्टिकोनानुसार अध्यक्षपदासाठी केवळ जातीसंबंधी समीकरणं नव्हे, तर संघटन कौशल्य आणि रणनीती आखण्याचं सामर्थ्य असणाऱ्या नेत्यालाच प्राधान्य द्यावं, असा आग्रह होता – आणि खट्टर हे त्या सर्व अपेक्षांवर उतरले.
आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, खट्टर यांचं मंत्रिपद कोणाला दिलंं जाईल. हरियाणातीलच एखाद्या खासदाराला हे पद दिलं जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून प्रादेशिक संतुलन राखता येईल. मात्र, पंतप्रधान मोदी हे नेहमी अनपेक्षित नावं समोर आणत असतात. त्यामुळे कुणा तरुण, कार्यक्षम आणि प्रभावी व्यक्तीला नगरविकास मंत्रालय दिलं जाईल, अशीही शक्यता आहे.
सध्याच्या घडामोडींवरून हे स्पष्ट होतंय की, भाजप संघटनात्मक पातळीवर नव्या पर्वात प्रवेश करत आहे आणि मनोहर लाल खट्टर यांची निवड ही संघ-भाजप यांच्यातील एकात्मतेचं प्रतीक मानली जात आहे. आता नव्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढची राजकीय दिशा काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.