आकाश आनंद यांची बसपमधून हकालपट्टी; पद काढून घेतल्यानंतर २४ तासांत मायावतींची पुतण्याविरोधात मोठी कारवाई
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी धक्कादायक निर्णय घेत त्यांचा पुतण्या आकाश आनंदची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आकाश यांना पक्षातून काढून टाकण्यामागे त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ असल्याचं कारण सांगितलं जात आहे. मायावती यांनी एक्सवर पोस्ट करून यांची माहिती दिली आहे. पक्षाचे आणि चळवळीचे कल्याण लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
IIT BABA Arrested: ‘आयआयटी बाबा’ला पोलिसांकडून अटक; सोशल मिडिया आणि ड्रग्स…, पहा संपूर्ण प्रकरण
आकाश आनंद यांच्या सासऱ्यांच्या प्रभावाखाली पक्षाच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे त्यांना राष्ट्रीय समन्वयकासह सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आलं आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की या परिस्थितीत आकाशने त्याची परिपक्वता दाखवून यासर्व प्रकारावर पश्चात्ताप करायला हवा होता, अशी बाजू बसपच्या अखिल भारतीय बैठकीत पक्षाच्या सदस्यांनी मांडली.
“काल बसपच्या अखिल भारतीय बैठकीत, आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदासह सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आलं. कारण ते पक्षाच्या हितापेक्षा पक्षातून काढून टाकण्यात आलेले त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली राहिले, ज्यासाठी त्यांनी पश्चात्ताप केला पाहिजे आणि त्यांची परिपक्वता दाखवली पाहिजे, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पण आकाश आनंदची प्रतिक्रिया अपेक्षेच्या विरुद्ध होती, असं मायावती यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी एक लांबलचक उत्तर दिलं, ज्याचे वर्णन मायावतींनी अहंकारी आणि धर्मप्रचारविरोधी असं केलं. त्यांनी ते केवळ स्वार्थी वृत्ती असल्याचे वर्णन केले जे पक्षाच्या विचारसरणी आणि ध्येयाशी जुळत नाही. मायावती यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अशाप्रकारे वागणाऱ्या सर्व पक्ष सदस्यांना इशारा दिला आहे.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमान आणि स्वाभिमान चळवळीचे महत्त्व” यावर भर देत मायावतींनी हा निर्णय घेतला. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या शिस्तीची परंपरा कायम ठेवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रविवारीच पदावरून करण्यात आली होती हकालपट्टी
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची काही दिवसांपूर्वी समन्वयकपदी नियुक्ती केली होती. आकाश आनंद यांना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र काल त्यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मायावती यांनी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्यावरील जबाबदारी वाढवली आहे.
मायावती यांनी रामजी गौतम यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावर नेमणूक केली आहे. यापूर्वी मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्याकडील पक्षाच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या होत्या. बसपा प्रमुख मायावती यांनी आज पक्षाची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हे निर्णय जाहीर केलं होतं. दरम्यान, आता मायावती यांचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, मायावती यांनी यावरही पक्षाच्या बैठकीत उत्तर दिलं. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा कोणीही उत्तराधिकारी नसेल असं त्यांनी जाहीर केलं आहे.