LiveUnstoppable: मतचोरीच्या प्रकरणावरून सध्या देशात राजकारण तापले असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील फेरफारीवरून गंभीर आरोप केले आहेत. याविरोधात आज (११ ऑगस्ट) विरोधी पक्षाचे खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. पण पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेत त्यांचा मोर्चा अडवला. पोलिसांनी खासदारांच्या मोर्चाला निवडणूक आयोगाकडे जाण्यापासून रोखले. पण त्यानंतरही विरोधी खासदार चांगलेच आक्रमक झाले, विरोधी खासदारांनी घोषणाबाजी करत पोलिसांच्या या कृतीचा विरोध दर्शवला. त्यानंतरही पोलीस कारवाई करत राहिले.
त्यानंतर नवी दिल्लीचे डीसीपी देवेश कुमार महाला म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात होतो आणि निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवले होते. त्यांनी सांगितले होते की, पक्षातील कोणतेही ३० जण निवडणूक आयोगाकडे येऊ शकतात, परंतु २०० हून अधिक नेते येथे आले होते. सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना रोखण्यात आले. काही खासदारांनी बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्नही केला होता.”
तर दुसरीकडे निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. विरोधकांचा मोर्चा बॅरिकेडिंग करून थांबवण्यात आला मात्र अनेक खासदार बॅरिकेड्स वर चढून बाहेर पडले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बॅरिकेडवरून उडी मारली. तृणमूल काँग्रेसचे खासदार सागरिका घोष आणि महुआ मोइत्रा बॅरिकेड्सवर चढल्या. नंतर अखिलेश यादव यांनी धरणे आंदोलन करत पोलिसांचा निषेध केला.
राहुल गांधी म्हणाले, ‘परिस्थिती अशी आहे की निवडणूक आयोग काहीही बोलू शकत नाही. पण सत्य देशासमोर आले आहे. ही लढाई राजकीय नाही. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. ही एक व्यक्ती, एक मताची लढाई आहे. आम्हाला स्वच्छ मतदार यादी हवी आहे. तर, ‘हे लोक घाबरले आहेत. सरकार भित्रे आहे.’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
जयराम रमेश म्हणाले की, फक्त ३० नाही तर संपूर्ण विरोधी पक्ष निवडणूक आयोगाकडे जाईल. तर अखिलेश म्हणाले की, आम्हाला पाहिजे तितक्या लोकांकडे जाण्यास आम्ही तयार आहोत. जर पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले तर आम्ही निवडणूक आयोगाकडे जाण्यास तयार आहोत. पोलीस आम्हाला जाऊ देत नाहीत. पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना बसमध्ये नेण्यात आल्याचेही अखिलेश यादव यांनी सांगितले.
Unique Maruti Temples in Pune : पुण्यातील विचित्र नावाने ओळखली जाणारी मारुती मंदिरं आणि त्यांचा रंजक
दरम्यान, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० लोकांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेअभावी, जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती आहे. पण एकतर सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही. आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नव्हे तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता.
मतदार यादीतील अनियमिततेवरून लढाई सुरूच आहे. राहुलसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी काल यासंदर्भात एक मोहीम देखील सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केले आहे.