पुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या या पुण्याला एतिहासिक वारसा जसा लाभला आहे तसाच धार्मिक इतिहास देखील लाभला आहे. शिक्षण, एतिहासिक स्थळं याप्रमाणे संस्कृती जपणारं शहर म्हणून देखील पुणे शहराला पाहिलं जातं. याच पुण्यात मारुती मंदिरांचा प्राचीन इतिहास आहे. फक्त एवढचं नाही तर या मारुतीच्या मंदिरांची विचित्र नावं देखील प्रसिद्ध आहेत. अशी कोणती मंदिरं आहेत ते जाणून घेऊयात.
स्वराज्यसूर्य या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पुण्य़ातील या मारुती मंदिरांची गंमतीशीर माहिती देण्यात आली आहे.
तुळशीबागेतील जिलब्या मारुतीचं नाव प्रसिद्ध आहे. या जिलब्या मारुतीची गोष्ट देखील तशीच गंमतीशीर आहे. जिलब्या मारुती मंदिराचं पूर्वीचं नाव विसावा मारुती असं होतं. हे मंदिर वाटेतच असल्याने काही घटका आराम करण्यासाठी म्हणजेच विसावा घेण्यासाठी लोकं इथे थांबायची आणि पुढच्या प्रवासाला निघायची. त्यामुळे याला विसावा मारुती असं म्हटलं जातं होतं. या ठिकाणी कालांतराने एका हलवाईचं दुकान होतं. या हलावाईची मारुतीवर प्रचंड श्रद्धा होती. तो सुरुवातीच्या 11 ते 21 जिलेबींचा हार या मारुतीला अर्पण करायचा त्यामुळे विसावा मारूती पुढे जिलब्या मारुती म्हणून ओळखू लागला.
शनीवार वाड्याच्या पटांगणात असलेला हा बटाट्या मारुती. याचं नाव बटाट्य़ा कसं पडलं तर वाड्याच्या पटांगणात त्यावेळी मोठी बाजार पेठ असत. त्यावेळी भाजीमंडईतच हे मंदिर उभारलं होतं. ज्य़ा ठिकाणी हे मारुतीचं मंदिर होतं त्या ठिकाणी बटाटे विकणारे व्यापारी मोठ्या प्रमाणात होते म्हणून याला बटाट्य़ा मारुती म्हणून लोक ओळखू लागले.
शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला भांग्या मारुती हे हनुमानाचे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भांग विकली जायची. म्हणूनच या मंदिराला भांग्या मारुती असे नाव पडले. आता हे मंदिर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हेरिटेज लिस्टच्या ग्रेड ३ हद्दीत येतं.
पुण्यातील काही मारुती मंदिरे पेशवेकालीन काळातील आहे. त्यावेळी परिसरात घडलेल्या विशिष्ट घटनेच्या नावाने ही मंदिरं ओळखली जातात. पुण्याच्या रास्ता पेठेत पेशव्यांच्या फौजेला उंट बांधून ठेवण्याची जागा होती. त्याजवळच असलेले हनुमान मंदिर कालांतराने उंटाड्या मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
डुल्या मारुती मंदिर गणेश पेठेजवळ लक्ष्मी रोडवर आहे. एका कथेत असे म्हटले आहे की, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची अहमदशहा अब्दालीशी लढाई झाली. या लढाईदरम्यान राज्य आणि पुणे शहरावर झालेल्या दुःखाने ही हनुमानाची मूर्ती थरथरायला आणि डोलायला लागली होती. म्हणून या प्राचीन मंदिराला काही वर्षाने डुल्या मारुती अस नाव पडलं.
नारायण पेठेतील या प्राचीन हनुमान मंदिरात 1867 पासून पत्रे आहेत. असे म्हणतात की ससून रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान पहिल्यांदाच पुण्यात पत्रे मागवण्यात आले होती. त्यापैकी काही उरलेले या हनुमान मंदिरात ठेवण्यात आले होते. त्याच उरलेल्या पत्र्यांचा वापर ह्या मंदिरासाठी झाला व तेव्हापासून हे मंदिर पत्र्या मारुती म्हणून ओळखले जाऊ लागले.
लक्ष्मी रस्त्यावरील तुळशीबागेत ‘खरकट्या मारुती’ मंदिर आहे. पूर्वी दुसऱ्या गावातून दर्शनासाठी आलेले भाविक, शेतकरी मंदिराच्या परिसरात भाकरी खाण्यासाठी बसत. त्यावरून या मारुतीला ‘खरकट्या मारुती’ नाव पडलं.
शुक्रवार पेठेत ‘दुध्या मारुती’चं मंदिर आहे. पूर्वी येथील मंदिराच्या परिसरात गायी-म्हशींचा गोठा होता, येथून दूध-तूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचं. त्यावेळी आजूबाजूच्या देवांना पाण्याने अभिषेक केला जायचा, मात्र येथील मारुतीला गवळी दुधाने अभिषेक घालायचा, त्यामुळे या मारुतीला ‘दुध्या मारुती’ नाव पडलं.
हे मंदिर गुरुवार पेठेमध्ये आहे. “रड्या” हा शब्द या मंदिराच्या नावामागे असलेल्या एका विशिष्ट कारणामुळे आला आहे. या मंदिराला हे नाव का पडले, याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत, पण मुख्यत्वे, मंदिरातील हनुमानाची मूर्ती ‘रडताना’ किवा ‘दुःखाने व्याकूळ’ झाल्यासारखी दिसते, असे सांगितले जाते. त्यामुळे, या मंदिराला ‘रड्या मारुती’ असे नाव पडले आहे, असे स्थानिक सांगतात. परंतु काहींच म्हणणे असे ही आहे की, या मारुतीसमोर मृतदेह ठेवून रडायची पूर्वी प्रथा होती, म्हणूनच या मारुतीचं नाव ‘रड्या मारुती’ ठेवण्यात आलं.
‘भिकारदास मारुती’ मंदिर पुण्याच्या सदाशिव पेठेत असून या मंदिराची स्थापना जवळपास दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्या काळी या मंदिराची स्थापना गुजराती नागर समाजातील ‘भिकारदास सराफ’ या व्यक्तीने केली होती. भिकारदास यांच्या दानशूर वृत्तीमुळे येथील परिसरात ते खूप प्रसिद्ध होते. त्याकाळी त्यांनी या एक बाग विकत घेऊन त्या परिसरात हनुमानाचे मंदिर बांधले होते, त्यामुळे भिकारदास सराफांनी बांधलेल्या मंदिराला भिकारदास मारुती असे नाव देण्यात आले.