पुणे: काल संध्याकाळच्या सुमारास जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान हा भ्याड हल्ला पहलगाम येथे बैसरन येथे झाला आहे. दरम्यान आता या प्रकरणी केंद्र सरकार सतर्क झाले आहे. लष्कराचे या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,” काळ दिल्लीमध्ये वन नेशन वन इलेक्शनची बैठक सुरु होती. त्या बैठकीमध्येच आम्हाला या सगळ्या घटनेची माहिती मिळाली. आम्ही सगळे खासदार तिथे होतो, आम्हाला सगळ्यांना थोडी थोडी माहिती मिळत होती. त्यानंतर आम्ही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना फोन करून तेथील घटनेची माहिती घेतली.”
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तेव्हा आम्हाला पुण्यातील दोन पर्यटकांना गोळ्या लागल्याचे समजले. हि घटना दुर्दैवी आहे. कितीही निषेध केला तरी कमीच पडणार आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे. जोपर्यंत गृहमंत्रालय ऑफिशियल स्टेटमेंट देत नाहीत, तोपर्यंत सगळ्यांनी जबाबदारीने स्टेटमेंट दिले पाहिजेत. अजूनही अनेक पर्यटक अनेक भागात अडकले आहेत.”
“हि वेळ आता टीका टिपण्णी करण्याची नाही. पहिले भारतीय लोक सुरक्षित आहेत का? याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सगळ्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी. विमानाने परत येण्याची तिकीट आता तिकडे महाग झाली आहेत. मी विमान आणि रेल्वे यंत्रणेला फोन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही काही प्रॉफिट कमवायची वेळ नाही, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
२६ पर्यटकांची निर्दयीपणे हत्या करणाऱ्यांचे रेखाचित्र जारी
काश्मीर खोऱ्यात पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्या दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या हत्या करणाऱ्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे . जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचे रेखाचित्र सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी जारी केले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. या दहशतवादी हल्ल्यात तीन ते पाच दहशतवादी सहभागी होते, तर काही इतर स्थानिक लोकांनी मदतीची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जात आहे.
लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गृहमंत्री अमित शहा मंगळवारपासून श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. बुधवारी ते पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पोहोचले, जिथे दहशतवाद्यांनी नरसंहार केला होता.