देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. सर्व पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. निवडणुकीच्या प्रचाराची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. निवडणूक जिकंण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून तयारी केली जात आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका देखील करण्यात आल्या. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बारमेरमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाही
नरेंद्र मोदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मागील अनेक दिवसांपासून विरोधकांकडून मोदी सरकार संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा अनेक टीका केल्या जात आहेत. त्यांच्या या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
जिथे संविधानाचा विषय येतो, तेव्हा लक्षात ठेवा, मोदीचा शब्द लिहून ठेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाही. भारताचे संविधान सरकारसाठी गीता, रामायण, बायबल, कुराण आहे. आपलं संविधान आपल्यासाठी हे सर्व आहे,असे नरेंद्र मोदी म्हणाले. एससी-एसटी आणि ओबीसी यांच्यावर अनेक दशके भेदभाव करणारी काँग्रेस आता जुने रेकॉर्ड काढून वाजवत आहे. ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर ह्यात असताना निवडणुकीत त्यांचा पराभव केला, ज्या काँग्रेसने आणीबाणी लावून देशाचे संविधान संपवण्याचा प्रयत्न केला तीच काँग्रेस आता मोदी सरकार संविधान बदलणार असल्याचे खोटे आरोप करत आहे, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
पंतप्रधान मोदींची प्रचार सभा
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बारमेर येथे सभा आयोजित केली होती. या सभेला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या भागात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. भाजपचे कैलाश चौधरी बारमेर-जैसलमेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाहीत, या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.