नवी दिल्ली : मोहम्मद पैंगबर (mohammad paigambar) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका टीव्ही शोमध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इस्लामिक कट्टपंथियांच्या रडारवर त्या आहेत. केवळ निदर्शनांचा विरोध नाही तर शीर कलम करण्याच्या धमक्या त्यांना देण्यात आल्यात. शर्मा यांना देण्यात असलेल्या धमक्या या पोकळ नाहीत. यापूर्वीही इशनिंदेच्या नावाखाली अनेकांच्या कत्तली देशात आणि जगभरात झालेल्या आहेत. नुपूर शर्मा यांचे केवळ समर्थन केले म्हणून देशात दोन हत्या झाल्यात. त्यात पहिली हत्या महाराष्ट्रात अमरावतीत उमेश कोल्हे नावाच्या व्यक्तीची झाली आहे. तर राजस्थानात कन्हैय्यालाल याचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती. सलमान रश्मी यांनाही अशाच रोषाला सामोरे जावे लागले होते.
बंदुकीच्या लायसन्समुळे पुन्हा चर्चेत
नुपूर शर्मा यांना केवळ कट्टरपंथियांकंडूनच नाही तर अल कायदा आणि इसिस यासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्याही धमक्या आल्या आहेत. त्यातच या वाढत्या धमक्यांमुळं नुपूर शर्मा यांनी बंदुकीचं लायसन्स घेतलंय. त्यामुळं त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. त्यांना बंदुकीचं लायसन्स मिळालं असलं तरी त्यांच्या जीवाला असलेला धोका कमी झालेला नाही. त्यामुळेच नुपूर शर्मा अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. जीवाला धोका असतानाच शर्मा यांनी बंदुकीचं लायसन्स घेतल्याची बातमी बाहेर कशी आली, असाही प्रश्न विचारण्यात येतोय. लायसन्सधारी प्रत्येक व्यक्तीचे नाव समोर येत नाही, मात्र नुपूर शर्मा यांच्याबाबतची ही माहिती समोर कशी आली, असे विचारण्यात येतेय.
मे २०२२ पासून सातत्यानं धमक्या
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त प्रकरणाचे पडसाद संपूर्ण जगात उमटले होते. आंतरराष्टीय पातळीवर मुस्लीम देशांनी या प्रकरणात भारताकडं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नुपूर शर्मा यांची भाजपाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. या प्रकरणात देशाच्या अनेक शहरात नुपूर शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या. सायबर सेलकडून नुपूर यांची चौकशीही करण्यात आली. त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर आता नुपूर एका अज्ञात स्थळी राहत असल्याची माहिती असून, त्यांना सुरक्षाही देण्यात आल्याची माहिती आहे. नुपूर यांच्या नातेवाईकांनाही आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन धमक्यांचे फोन येत आहेत.