'पर्यटन संघर्षमुक्त असावं अन् दहशतवाद...; पहलगाममध्येच बैठक घेत ओमर अब्दुल्लांनी दिला महत्त्वाचा संदेश
गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या पाहलगाममध्ये मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. “पर्यटन हे संघर्षमुक्त असावे आणि त्याला येथील परिस्थितीपासून वेगळे ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दुहेरी सत्ताकेंद्रे असण्याच्या आव्हानांचा उल्लेख करताना – त्यांचे सरकार आणि उपराज्यपाल – ओमर म्हणाले की “तीन सरकारे” (या दोन संस्था आणि केंद्र) यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. “पर्यटन ही माझी जबाबदारी आहे, परंतु पर्यटकांची सुरक्षा ही माझी जबाबदारी नाही,” ते म्हणाले. “येथे, तीन सरकारांना एकत्र काम करावे लागेल: जम्मू आणि काश्मीरचे निवडून आलेले सरकार, जम्मू आणि काश्मीरचे निवडून न आलेले सरकार आणि केंद्र.”
“पर्यटन ही केवळ आर्थिक क्रिया आहे, ही जगाने तशीच पाहिली पाहिजे. ती येथील अस्थिरतेशी जोडली जाऊ नये. माझे सरकार पर्यटनाला येथील परिस्थितीपासून वेगळे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “गेल्या पाच-सहा आठवड्यांमध्ये देशभरात अनेक कठीण प्रसंग घडले, पण त्याचा सर्वाधिक परिणाम जम्मू-काश्मीरवर झाला आहे. आम्ही सावधपणे, पण निश्चितपणे पर्यटन पुन्हा सुरू करण्याचे पावले उचलत आहोत आणि मला खात्री आहे की केंद्र सरकारदेखील आवश्यक त्या बाबतीत आमची साथ देईल.”
“पंतप्रधानांनीही या विषयावर काही महत्त्वाचे पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली, ज्यात वरिष्ठ अधिकारी आणि पर्यटन मंत्री सहभागी होते. नुकत्याच झालेल्या नीति आयोगाच्या बैठकीत मी पंतप्रधानांशी चर्चा केली. काही गोष्टी इथे उघड करता येणार नाहीत, पण काही ठोस निर्णय लवकरच घेतले जातील.आज पाहलगाममध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली. ही केवळ प्रशासकीय बैठक नव्हती, तर एक ठाम संदेश होता – आम्ही दहशतवाद्यांच्या कायर हल्ल्यांना घाबरत नाही. शांततेचे शत्रू आमचा निर्धार डगमगवू शकत नाहीत. जम्मू-काश्मीर ठाम आहे, मजबूत आहे आणि निर्भय आहे,” असे त्यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर)वर पोस्ट केले.
ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, पाहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरक्षा पाहणीसाठी ४८ पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती – यात श्रीनगरमधील बडामवारी आणि ट्यूलिप गार्डनचाही समावेश होता. “जर ट्यूलिप गार्डन बंद करणे आवश्यक असेल, तर मग पूर्ण काश्मीर बंद करावे लागेल. बैसरान बंद ठेवू शकतो, पण बेटाब व्हॅली आणि अरू व्हॅली हे पर्यटन स्थळे पुन्हा सुरू केली पाहिजेत. पर्यटक स्वतःहून येथे आले आहेत आणि ते सांगत आहेत की, त्यांना इतक्याच छोट्या जागेत मर्यादित ठेवू नका.पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी धाडस दाखवावे लागेल. “थजीवास ग्लेशियर (सोनमर्ग) यासारखी ठिकाणे पुन्हा उघडण्याबाबतही चर्चा सुरू आहे. आपल्याला काळजीपूर्वक, पण धाडसाने पुढे जावे लागेल,” असे त्यांनी सांगितले.