बिहार निवडणुकांसाठी NDA चा मास्टर प्लान ठरला; या नेत्याच्या नेतृत्वात लढणार निवडणूक
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने जोरदार तयारी सुरू केली आहे. तडफदार तयारी करत असून, भाजप व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल (JDU) यांनी एकत्रित मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकजूट दाखवत जिल्ह्यापासून पातळीवर पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केंद्र व राज्यातील “डबल इंजिन” सरकारच्या कामगिरीचं भव्य प्रदर्शन उभं केलं आहे.
६० हून अधिक पत्रकार परिषद
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीपासून आतापर्यंत बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये ६० हून अधिक संयुक्त पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये एनडीएच्या घटक पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला असून, जिल्हास्तरावर समन्वय बैठका सुद्धा झाल्या आहेत.
“विरोधकांची INDIA (महागठबंधन) आघाडी विस्कळीत आहे, तर एनडीए ठाम आणि एकसंध आहे,” असे एका भाजप नेत्याने म्हटले. “सीट वाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू नसतानाही आम्ही एकत्रित प्रचार सुरू केला आहे. आमचं उद्दिष्ट म्हणजे विकास आणि स्थैर्य.”
प्रचारामध्ये आयुष्मान भारत, मुख्यमंत्री महिला उद्यमी योजना अशा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांवर भर देण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर या योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रचारात समावेश
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’ला महत्त्व देण्यात आलं आहे. या मोहिमेद्वारे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधातील भारताच्या कारवाईला ग्लोबल पाठिंबा मिळवण्यासाठी सात पथकं परदेशात पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये जदयूचे संजय झा यांचाही समावेश होता.
बिहारमधील पारंपरिक जातींच्या राजकारणात ‘जातनिहाय सर्वेक्षण’ महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. याआधी एनडीएतील भाजप या सर्वेक्षणाबाबत साशंक होती, परंतु आता केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेत जातीनिहाय मोजणीचा समावेश केल्यामुळे एनडीएकडे या मुद्द्याचा वापर करण्याची संधी मिळाली आहे. भाजपचे एक नेते म्हणाले, “आमच्याकडे सुमारे १६ यादव नेते आहेत. आरजेडी यादवांचं प्रतिनिधित्व फक्त लालू यादव कुटुंबापुरतं मर्यादित आहे, तर आमच्या आघाडीत सर्व जातींना संधी आहे.”
महिलांना मतदार म्हणून आकर्षित करण्यासाठी बिहार सरकारच्या योजनांवर भर दिला जात आहे. मुलीच्या जन्मापासून ते पदवीपर्यंत शिक्षणासाठी थेट आर्थिक मदतीची माहिती दिली जात आहे. याशिवाय केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘माखाना बोर्ड’चाही वापर प्रचारात केला जात आहे. उत्तर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर दलित व मागासवर्गीय महिला माखाना उत्पादनात कार्यरत आहेत.
Tejashwi Yadav : ‘जावई झाले आता मेहुणे, पत्नी आयोग स्थापन करा’; तेजस्वींचा CM नितीश कुमारांना टोला
भाजप व जदयूने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांसाठी प्रचार आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यानंतर बिहारच्या प्रचाराकडे विशेष लक्ष देण्यात येईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
सध्या एनडीए आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे प्रचारयंत्रणा उभारण्याच्या तयारीत आहेत. ‘नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार’ हा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. एकात्मता, विकासाच्या योजना आणि सामाजिक समन्वय या तीन प्रमुख मुद्द्यांवर एनडीए बिहार निवडणुकीत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.