मातोश्रीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक; मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रमुख नेत्यांकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही तरी दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मोतोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
Sunetra Pawar News: अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? सुनेत्रा पवारांनी दिले उत्तर
शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत आज झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा झाली. तसंच मनसेसोबत युती करायची का नाही याबाबतही उद्धव ठाकरेंनी विचारणा केली, त्यावर युती झाली तर फायदाच होईल, अशी कबुली नगरसेवकांनी दिल्याचं समजतं. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचेही माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी बोलताना म्हटलं आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा जोरात सुरू आहे. दोन्ही पक्षांसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जात आहे. आता मातोश्री येथे माजी नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना विचारले की मनसेसोबत युती करायची का? युतीचा फायदा त्यांनाच होईल यावर नगरसेवकांचे एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई महापालिकेसाठी मी तुम्हाला विश्वासात घेईन आणि पालिकेसाठी कोणत्या पक्षाशी युती करायची हे ठरवेन. तुम्ही आमच्यासोबत आहात, तुम्ही निष्ठावंत आहात, येत्या काळात अनेक बैठका होणार आहेत. माजी नगरसेवकांनी शिवसेना भवनात येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावेत, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या. तसंच शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक जुना फोटो चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसत होते. हा फोटो शिवसेनेच्या (यूबीटी) मुखपत्र ‘सामना’ च्या पहिल्या पानावर प्रकाशित झाला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या फोटोच्या प्रकाशनाची वेळ महत्त्वाची आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबत युतीचे सकारात्मक संकेत दिले आहेत.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात. पण निवडणुकीनंतर ते एकत्र राहतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. हिंदुत्व आणि मराठी माणसांबाबत दोन्ही पक्षांची विचारसरणी जवळजवळ सारखीच आहे, मात्र एकत्र येण्यासाठी अनेक अटी आहेत. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सोडावी लागेल आणि राज ठाकरेंना महायुतीशी असलेले आपले नाते सोडावे लागणार आहे.