मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून नितीश कुमारांचा पत्ता कट होणार? निवडणुकीपूर्वी या नेत्याचा मोठा दावा
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीतही एनडीए विरुद्ध महाआघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव करतील की कॉंग्रेस? आणि रणनीतीकार प्रशांत किशोर काही राजकीय चमत्कार घडवतील का? याची चर्चा सध्य बिहारमध्ये सुरू आहे.
तेजस्वी यादव यांचा डाव त्यांच्यावर पलटला! निवडणूक आयोगाने सुरु केली दुसऱ्या मतदार कार्डची चौकशी
या सगळ्या मुद्द्यांवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभा खासदार पप्पू यादव यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पूर्वी जन अधिकार पक्षाचे नेते असलेले पप्पू यादव सध्या काँग्रेससोबत कार्यरत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत दावा केला की, भाजप नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार नाही, अशी पूर्ण शक्यता आहे.
भाजपला नितीश कुमार कधीच चालले नाहीत : पप्पू यादव
भाजपने नितीश कुमार यांना कधीही मनापासून मुख्यमंत्री म्हणून मान्य केलेलं नाही. आजही त्यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा टिकून आहे. मात्र वक्फ कायद्यातील बदलांना एनडीएने पाठिंबा दिल्यामुळे अल्पसंख्यांक समाजात नाराजी आहे. राहुल गांधी ६५ टक्के आरक्षण आणि जातनिहाय जनगणनेची मागणी करतात, त्यावेळी नितीश कुमार शांत राहतात, असा सवाल त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, “बिहारमध्ये भाजपचं अस्तित्व नितीश कुमारांशिवाय शून्य आहे. आता EBC वर्गालाही हे समजून चुकलं आहे की भाजपने त्यांच्या नेत्याला कमजोर केलं आहे. त्यामुळे EBC, SC, ST, OBC आणि अल्पसंख्यांकांचं मत काँग्रेसकडे वळू लागलं आहे”
“भाजप नितीश कुमार यांना शेवटी फसवणारचं. त्यामुळे त्यांनी महाआघाडीत परत यावं. मी त्यांचा वैयक्तिकरित्या आदर करतो आणि आमचे सर्व नेतेही त्यांचा सन्मान करतात.”
“काँग्रेसला बिहारमध्ये RJDची गरज आहे का?” या प्रश्नावर पप्पू यादव म्हणाले, “जर भाजपला नितीश कुमारांची गरज भासत असेल, तर काँग्रेसला RJDची गरज का भासू नये? आज बिहारमध्ये कोणतंही राजकीय समीकरण काँग्रेसशिवाय तयार होऊ शकत नाही. लोक पुन्हा काँग्रेसकडे बघू लागले आहेत.”बिहारसाठी सर्वात मोठा धोका भाजपच आहे. भाजप फक्त नितीश कुमारांमुळे सत्तेत आहे. परिस्थिती गंभीर आहे. आम्हाला नितीशजी बळकट व्हावेत असं वाटतं, पण भाजप मात्र त्यांना कमकुवत करतोय.”
महाआघाडीत जागावाटपाबाबत काय परिस्थिती आहे?
पप्पू यादव म्हणाले, “माझं महाआघाडीत कुठंही स्थान नाही. मला ना कुठल्या बैठकीला बोलावलं जातं, ना मी कोणत्याही जागा वाटपाच्या चर्चेत आहे. पप्पू यादवला कोण विचारतो? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी राहुल गांधींच्या विचारधारेचा प्रचार करतो. बिहारची अवस्था फार वाईट आहे. तीन कोटी लोकांनी स्थलांतर केलं आहे. गेल्या ३०-४० वर्षांत राज्यात कुठलाही गुंतवणूक प्रकल्प राबवलेला नाही. एकही कारखाना उभा राहिलेला नाही. खाद्यप्रक्रिया उद्योगाला प्रचंड संधी आहे, पण यावर कुणीच बोलत नाही.”
महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव असतील का? यावर पप्पू यादव म्हणाले, या विषयावर भाष्य करण्याचा मला अधिकार नाही. आम्ही निवडणूक राहुल गांधींच्या विचारांवर लढवणार आहोत आणि INDIA आघाडीला विजय मिळवून देणार आहोत. माझं लक्ष यावरच आहे.”
प्रशांत किशोरा यांच्या भूमिकेवर काय म्हणाले?
पप्पू यादव म्हणाले, “प्रशांत किशोर बिहारच्या निवडणुकीत काय भूमिका निभावतील हे स्पष्ट नाही. ते आधी अमेठी, मग मोदींसोबत, मग नितीश कुमार, ममता आणि नंतर काँग्रेससोबत होते. आज ते AC व्हॅनमध्ये फिरतात आणि म्हणतात ‘मी दौरा करत आहे. आणि मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहतात. बिहारमध्ये आता EBC, SC, ST, OBC वर्गात राजकीय जागरुकता आली आहे. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री याच वर्गातून कुणीतरी असेल.
पप्पू यादव यांनी मोठा दावा करत सांगितलं की, “आता पुढची ५० वर्षं उच्चवर्णीय नेते बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत. देशात राजकीय भूक जागृत झाली आहे. जेव्हा ९० टक्के जनता मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि वंचित असते, तेव्हा उरलेल्या १० टक्के लोकांनीच का राज्य करावं?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.